सोलापूर विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशपूर्व परीक्षेसाठी 26 मे पर्यंत अर्ज करता येणार
29 ते 31 मे दरम्यान ऑनलाइन प्रणालीद्वारे प्रवेशपूर्व परीक्षा होणार
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संकुलात तसेच संलग्न काही महाविद्यालयांमध्ये विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता प्रवेश घेण्यासाठी प्रवेशपूर्व परीक्षेचे नियोजन करण्यात आले असून यासाठी दि 26 मे 2024 पर्यंत विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करता येणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ श्रीकांत अंधारे यांनी दिली.
विद्यापीठाचे कुलगुरू प्रा प्रकाश महानवर आणि प्र-कुलगुरू प्रा लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रवेशपूर्व परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या www.sus.ac.in या संकेतस्थळावरून विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेशपूर्व परीक्षेकरिता ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 12 मे 2024 पासून सुरू झाली असून विद्यार्थ्यांना दि 26 मे 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. पदवी उत्तीर्ण विद्यार्थी व पदवी अंतिम परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश पूर्व परीक्षेसाठी बसता येणार आहे. दि 29 ते 31 मे 2024 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने प्रवेश पूर्व परीक्षा होणार आहे. त्याचे नियोजन विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून करण्यात आले आहे.
पदार्थविज्ञान संकुलाच्या एमएससी फिजिक्स- अप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स, मटेरियल सायन्स, कंडेन्सड मॅटर फिजिक्स, एनर्जी स्टडी, सॉलिड स्टेट व नॅनो फिजिक्स, एमएससी इलेक्ट्रॉनिक सायन्स, इलेक्ट्रॉनिक अंड इलेक्ट्रॉनिक्स इंटरनेट ऑफ थिंग्स अभ्यासक्रमासाठी प्रवेशपूर्व परीक्षा होणार आहे. तसेच विद्यापीठ संकुलातील एमएससी मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी आणि बायोइन्फॉर्मटिक्स या अभ्यासक्रमांसाठी ही पूर्व परीक्षा होणार आहे.
विद्यापीठ संकुलातील एमएससी केमिस्ट्रीच्या पॉलिमर, ऑरगॅनिक, इंडस्ट्रियल, मेडिसिनल केमिस्ट्री, इनऑरगॅनिक, फिजिकल, एनालिटिकल, फार्मास्युटिकल एमएससी इन्व्हरमेंटल सायन्स, एमएससी कम्प्युटर सायन्स मॅथेमॅटिक्स, एमएससी स्टॅटिस्टिकस, एमएससी बायोस्टॅटिस्टिकस, एम.ए.मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमांसाठी प्रवेश पूर्व परीक्षा होणार आहे. याचबरोबर एमएससी बॉटनी, झूलॉजी, एमएससी ऍग्रोकेमिकल अँड पेस्ट मॅनेजमेंट, इंटरप्रिनरशिप या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेशपूर्व परीक्षा होणार आहे. विद्यापीठ संकेतस्थळावर सविस्तर वेळापत्रक देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरून वेळापत्रकानुसार प्रवेशपूर्व परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
विद्यापीठ अधिविभागात या अभ्यासक्रमांसाठी थेट प्रवेश
एमएससी जिओलॉजी, जिओइन्फॉर्मेटिक्स, एम ए प्राचीन भारतीय इतिहास आणि पुरातत्वशास्त्र, ग्रामीण विकास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र आणि इतिहास, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, एम ए मराठी, हिंदी, इंग्लिश, संस्कृत, उर्दू, पाली, प्राकृत आणि कन्नड, एम ए संगीत, नाटक, तबला व पखवाज आणि व्हिज्युअल आर्ट्स, एम कॉम ऍडव्हान्स अकाउंटन्सी, ऍडव्हान्स बँकिंग आणि एमबीए, बीव्होक पत्रकरिता व जनसंज्ञापन, ऍडव्हान्स पी जी डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक मीडिया, पी जी डिप्लोमा इन म्युझिकोलॉजी, फाईव्ह इयर एमटेक कोर्स इन कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी, पीजी डिप्लोमा इन डायटिक्स अँड न्यूट्रिशन आणि एम ए योगा या अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठाच्या परिसरातील अधिविभागांमध्ये थेट प्रवेश देण्यात येणार आहे.
प्रवेश पूर्व परीक्षेचे वेळापत्रक
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ परिसर व संलग्न महाविद्यालयामध्ये शिकवल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमास प्रवेश पात्र विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या www.sus.ac.in या लिंकवर जाऊन ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. ही प्रवेश पूर्व परीक्षा वेब बेस्ड ऑनलाइन प्रणाली द्वारे घेतली जाणार आहे. परीक्षेची लिंक 24 तास उपलब्ध राहणार आहे. 26 मे 2024 पर्यंत प्रवेश पूर्व परीक्षा देण्यासाठी ऑनलाईन नोंदणी विद्यार्थ्यांना करता येणार आहे. प्रवेश पूर्व परीक्षेची पूर्वतयारी सराव चाचणी 27 मे 2024 रोजी होणार आहे.
अंतिम प्रवेश पूर्व परीक्षा दिनांक 29 ते 31 मे 2024 पर्यंत 24 तास उपलब्ध राहणार आहे. परंतु परीक्षा कालावधी हा केवळ 60 मिनिटांचा असेल. प्रवेश पूर्व परीक्षा शुल्क पाचशे रुपये राहणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना एकापेक्षा जास्त अभ्यासक्रमांची प्रवेश पूर्व परीक्षा द्यावयाची आहे, त्यांनी प्रत्येक अभ्यासक्रमांसाठी 200 रुपये अधिकचे शुल्क भरावे लागणार आहे. परराज्यातील पात्र विद्यार्थ्यांनाही विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश पूर्व परीक्षा देता येणार असल्याचे प्र-कलगुरू प्रा लक्ष्मीकांत दामा यांनी सांगितले.