अमरावती विद्यापीठाकडून उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार 2024 साठी अर्ज आमंत्रित
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने विद्यापीठ व पर्यायाने महाविद्यालयांना उत्कृष्ट सेवा देणाया प्राचार्य, संचालक, विद्यापीठ व महाविद्यालयातील शिक्षक, प्रथम व द्वितीय श्रेणी अधिकारी तसेच तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचायांना उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार देवून दरवर्षी 1 मे रोजी गौरविल्या जाते. यावर्षी सुद्धा 1 मे, 2024 रोजी उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार देवून त्यांचा यथोचित गौरव केल्या जाणार आहे. प्रमाणपत्र, शाल व श्रीफळ आणि 100 ग्रॅम वजनाचे चांदीचे पदक असे पुरस्काराचे स्वरुप आहे. या पुरस्कारासाठी विद्यापीठ व महाविद्यालयांतील प्राचार्य, संचालक, शिक्षक, अधिकारी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचेकडून अर्ज आमंत्रित केले आहे.
आवेदनपत्र सादर करण्याची अंतीम तारीख 31 मार्च, 2024 रोजी दुपारी 5.00 वाजेपर्यंत असून त्यानंतर प्राप्त होणारे अर्ज कुठल्याही परिस्थितीत विचारात घेतले जाणार नाहीत, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावयाची आहे.विद्यापीठातील शिक्षक, प्रथम श्रेणी अधिकारी, द्वितीय श्रेणी अधिकारी, तृतीय श्रेणी कर्मचारी व चतुर्थ श्रेणी कर्मचारी या वर्गवारीत, तर संलग्नित महाविद्यालयांमधून प्राचार्य / संचालक, शिक्षक आणि सर्व स्तरावरील शिक्षकेत्तर कर्मचारी या वर्गवारीत पुरस्कार प्रदान केले जातात. तसेच नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या संदर्भात महाविद्यालये किंवा संस्थेचे प्रस्ताव असल्यास ते सुद्धा विहित मुदतीत विद्यापीठाला सादर करावयाचे आहेत.
या संदर्भात सविस्तर माहिती व अर्ज विद्यापीठाच्या www.sgbau.ac.in या संकेतस्थळावर ‘अवार्डस अॅन्ड अचिव्हमेन्ट्स’ यावर उपलब्ध असून सर्व संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य, संचालक व शैक्षणिक विभागप्रमुखांना पत्र पाठवून विद्यापीठाच्या आस्थापना विभागाने कळविले आहे. तरी सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी व आपले आवेदनपत्र विहित मुदतीत सादर करावे, असे आवाहन विद्यापीठाच्यावतीने कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी आस्थापना विभागाचे उपकुलसचिव मंगेश वरखेडे यांना मो.क्र. 9881375033 वर संपर्क साधता येईल.