गोंडवाना विद्यापीठाचे लेखा-मेंढा येथे एक दिवसीय ‘अनुभूती’ आदिवासी जीवन व संस्कृती कार्यक्रम संपन्न
समाजासाठी कार्य करणारे नेतृत्व तयार होणे गरजेचे -प्र-कुलगुरु डॉ श्रीराम कावळे
गडचिरोली : आदिवासी संस्कृती व जीवनपद्धती जगातील प्राचीन संस्कृती असुन सर्वांसाठी गौरवाची बाब आहे. पुस्तकी ज्ञानाच्या सोबतीला अनुभवातील ज्ञानाची जोड असणे हे विद्यार्थ्यांच्या सर्वागींण विकासाकरीता उपयुक्त ठरेल. विद्यार्थ्यानी कोणत्याही क्षेत्रात गेल्यास समाज व राष्ट्राप्रती असलेली जबाबदारी व जाणीव असणे आवश्यक आहे. आधुनिकीकरणाच्या काळात विद्यार्थी व समाज यामधील दुरावा दुर करणे या कार्यक्रमाच्या माध्यमातून साध्य होईल असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे यानी केले. गोंडवाना विद्यापीठाच्या इंग्रजी पदव्युत्तर शैक्षणिक विभाग व आदिवासी अध्यासन केंद्राद्वारे आयोजित ‘अभ्यास भेट ‘अनुभूती’ आदिवासी जीवन व संस्कृती या विषयावर लेखा-मेंढा येथे एक दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, प्रमुख मार्गदर्शक डॉ.कुंदन दुपारे, डॉ. देवाजी तोफा व सरपंच नंदाताई दुग्गा उपस्थित होते. कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना आदिवासी जीवनशैली आणि संस्कृतीचा सखोल अनुभव घेण्याची संधी देणे व त्यांचे समाजाप्रती असलेले दायित्व या विषयी जाणीव करून घेणे हा आहे. डॉ. कुंदन दुपारे यांनी आदिवासी समाजामध्ये असलेले जैवविविधतेचे महत्व समजावून सांगितले. तसेच प्रात्यक्षिकाद्वारे बांबू व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यात आले. आदिवासी समाजाकडे असलेला जैवविविधतेचा ठेवा जतन करुन त्या समोरील आव्हाने यासंदर्भात उपस्थित विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. बांबू प्रशिक्षणावर पार पडलेल्या सत्रातून विद्यार्थ्यांना आदिवासी परंपरा तसेच शाश्वत पद्धतींची माहिती मिळाली. डॉ. देवाजी तोफा यांनी मेंढालेखा ग्रामसभा अधिकार मिळवण्याची पार्श्वभूमी समजावुन सांगताना विद्यार्थ्यांनी संशोधनातून आदिवासी जीवन व संस्कृतीबद्दल असलेले गैरसमज दुर करून गौरवशाली आदिवासी संस्कृती व जीवन पद्धतीचा इतिहास जगासमोर आणण्याची जबाबदारी घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी निवडणूक जागरूकता, व्यसनमुक्ती आणि आदिवासी अभ्यासाच्या महत्वपूर्ण मुद्द्यावर पथनाट्य सादर केले.
“अनुभूती” हे एक अशा प्रकारचे व्यासपीठ आहे, जे आदिवासी समुदायाचा सांस्कृतीक वारसा आणि त्यांच्यासमोर येणाऱ्या आव्हानांशी जोडून घेते. असे आदिवासी अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. वैभव मसराम यांनी म्हटले. तसेच विद्यार्थ्यांना भारतीय समाजाची विविधरंगी माहिती देऊन त्यांच्यात आदर, सहानुभूती आणि कळकळ ही मूल्ये रुजविल्या जातात, जी राष्ट्रीय एकात्मतेसाठी अत्यावश्यक आहेत. असे डॉ. विवेक जोशी यांनी सांगितले. यावेळी विद्यापीठ तसेच स्थानिक समुदायातील सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. डॉ. शिल्पा आठवले, डॉ. प्रमोद जावरे, सहा. प्राध्यापक अतुल गावस्कर यांनी योगदान दिले.
याप्रसंगी आदिवासी संस्कृतीचे विविध सादरीकरण करणाऱ्या कार्यक्रमातून सामाजिक जाणीव आणि सांस्कृतीक संवेदनशीलता वाढविण्याची प्रतिबद्धता दिसून आली. कार्यक्रमाचे संचालन प्रबोधी वेस्काडे यांनी तर आभार आलिशा गजभिये यांनी मानले.