देवगिरी महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन – २०२४ उत्साहात संपन्न
विद्यार्थ्यांनी परिघाबाहेरील स्वप्न पहावेत – सिने अभिनेत्री परी तेलंग
छत्रपती संभाजीनगर : विद्यार्थी जीवनात आपण बहुआयामी व्यक्तिमत्व निर्माण केले पाहिजे. याच वयात आपण परिघाच्या बाहेरील स्वप्न साकार केली पाहिजेत. सृजनशील स्वप्नांना सीमा नसतात. मनोरंजन क्षेत्राने समाजातील चांगल्या बाजू समोर आणल्या पाहिजेत व सकारात्मक समाजाचे चित्रण केले पाहिजे. या माध्यमातून आपण सामाजिक बांधीलकी जोपासू शकतो. विद्यार्थ्यांना समाज माध्यमांमुळे स्वतःला सिद्ध करण्याच्या विविध संधी तसेच व्यासपीठ उपलब्ध आहेत. त्याचा नेमकेपणाने वापर आपल्याला करता आला पाहिजे. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी प्राप्त होऊ शकते. या समृद्ध जीवनासाठी आपण परीघाबाहेरील मार्गांवरती विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे असा मौलिक सल्ला सिनेअभिनेत्री परी तेलंग यांनी बक्षीस वितरणाच्या प्रसंगी विद्यार्थ्यांना दिला.
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित देवगिरी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर वार्षिक स्नेहसंमेलन २०२४ पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर होते. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री परी तेलंग, मुंबई या उपस्थित होत्या. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ केंद्रीय कार्यकारणी सदस्य त्रिंबकराव पाथ्रीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. वार्षिक स्नेहसंमेलनाच्या अनुषंगाने वर्षभरात विविध क्षेत्रांमध्ये विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला यामध्ये राष्ट्रीय पातळीवरती, राज्य पातळीवर विद्यापीठ स्तरावर विविध ठिकाणी विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर म्हणाले की, देवगिरी महाविद्यालय औपचारिक शिक्षणासोबतच अनोपचारिक शिक्षण यासाठी बांधील आहे. उच्च शिक्षणातील गुणवत्तेची परंपरा देवगिरी महाविद्यालयाने कायम ठेवली आहे. विद्यार्थ्यांच्या साहित्य, कला, संस्कृती, क्रीडा, विज्ञान आणि संशोधन आधी गुणांना विकसित करत आहे. ही दैदीप्यमान परंपरा घेऊन देवगिरी महाविद्यालय आता स्वायत्तेकडे वाटचाल करत आहे. तसेच मराठवाडा शिक्षण प्रसारक केंद्रीय कार्यकारी सदस्य मा. त्रिंबकराव पाथ्रीकर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले. याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिल आर्दड, उपप्राचार्य डॉ. अपर्णा तावरे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन पारितोषिक वितरण समारंभ समन्वयक डॉ. गणेश मोहिते यांनी केले.