गोंडवाना विद्यापीठात स्वामी विवेकानंद जयंती निमित्त प्रेरणादायी व्याख्यान

आपले आयुष्य हे राष्ट्रासाठी असावे – प्रा. धर्मेंद्र मुनघाटे

गडचिरोली |

युगनायक स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त गोंडवाना विद्यापीठातील स्वामी विवेकानंद अध्यासन केंद्राच्या वतीने प्रेरणादायी व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमात सिनेट सदस्य प्रा. धर्मेंद्र मुनघाटे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते, तर गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून स्वामी विवेकानंद अध्यासन केंद्राचे प्रस्तावक व व्यवस्थापन परिषद सदस्य प्रशांत दोन्तुलवार, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. संजय गोरे, तसेच कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ. अपर्णा भाके उपस्थित होत्या.

An inspirational lecture was held at Gondwana University on the occasion of Swami Vivekananda Jayanti.

अध्यक्षीय भाषणात प्रभारी कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे आजच्या समाजात आणि विशेषतः युवकांमध्ये असलेले महत्त्व अधोरेखित केले. “स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मविश्वास, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा देणारे असून युवकांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी मार्गदर्शक आहेत,” असे त्यांनी नमूद केले.

मुख्य वक्ते प्रा. धर्मेंद्र मुनघाटे यांनी आपल्या प्रभावी व्याख्यानातून स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्यावर सखोल प्रकाश टाकला. त्यांनी स्वामीजींचे बालपण, संन्यासाचा प्रवास, शिकागो येथील जागतिक धर्मपरिषदेत दिलेले ऐतिहासिक भाषण तसेच युवकांसाठी दिलेले आत्मबल, परिश्रम आणि चारित्र्यनिर्मितीचे संदेश प्रभावीपणे मांडले.

“युवकांनी आत्मविश्वास बाळगून ज्ञान, विज्ञान आणि अध्यात्म यांचा समन्वय साधत समाजपरिवर्तनासाठी कार्य करावे. आपले आयुष्य हे राष्ट्रासाठी असावे,” असे आवाहन प्रा. मुनघाटे यांनी केले.

वक्त्यांचा परिचय सहाय्यक प्रा. अनंता गावंडे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रस्तावक व व्यवस्थापन परिषद सदस्य प्रशांत दोन्तुलवार यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन धैर्यशील खामकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन समन्वयक डॉ. अपर्णा भाके यांनी मानले.

या व्याख्यानातून स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा युवकांवर सकारात्मक प्रभाव पडून आत्मविकास, राष्ट्रनिर्माण आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com