संंत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात राजमाता जिजाऊ जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
विद्याथ्र्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा आदर्श घ्यावा – अधिष्ठाता डॉ. मोना चिमोटे
अमरावती | दि. १२ जानेवारी २०२६
महापुरुषांचे विचार हे नव्या पिढीसाठी दिशादर्शक असतात. राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचार व कार्याचा आदर्श घेऊन विद्याथ्र्यांनी आपली कला, कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकसित करावे, असे प्रतिपादन मानवविज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. मोना चिमोटे यांनी केले.
त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर दृकश्राव्य सभागृहात आजीवन अध्ययन व विस्तार विभागांतर्गत एम.ए. छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा व व्यवस्थापन विभागाच्या वतीने आयोजित राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या.
या वेळी व्यासपीठावर प्रभारी कुलसचिव डॉ. नितीन कोळी, वित्त व लेखा अधिकारी सीए. पुष्कर देशपांडे, इन्क्युबेशन सेंटरच्या प्रमुख डॉ. स्वाती शेरेकर तसेच स्पर्धेचे आयोजक व आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील उपस्थित होते.

डॉ. मोना चिमोटे यांनी वक्तृत्व स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन जाहीर करताना सांगितले की, स्वराज्य स्थापनेसाठी राजमाता जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांसारखा महान सुपुत्र घडविला. महाराजांना सर्वगुणसंपन्न बनविण्यात जिजाऊंचे संस्कार महत्त्वाचे ठरले. त्यांनी राज्यकारभारात स्त्रियांना सन्मान व समान संधी दिली.
राष्ट्रीय युवा दिनानिमित्त स्वामी विवेकानंदांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी असून त्यातूनच युवक बलशाली बनतो, असे त्यांनी नमूद केले.
समानतेचे विचारच शिवरायांच्या यशाचे कारण – डॉ. नितीन कोळी
प्रमुख अतिथी डॉ. नितीन कोळी म्हणाले की, सर्वांना समान संधी मिळावी हा विचार राजमाता जिजाऊंनी प्रत्यक्ष कृतीतून रुजविला. सर्व जाती-धर्मांच्या लोकांना समान वागणूक दिल्यामुळेच शिवाजी महाराज इतिहास घडवू शकले.
राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त दिला जाणारा ‘जिजाऊ लेक’ पुरस्कार हा महिलांच्या सन्मानाचा गौरवास्पद उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.
‘जिजाऊ लेक’ पुरस्काराने डॉ. स्वाती शेरेकर सन्मानित
इन्क्युबेशन सेंटरच्या प्रमुख डॉ. स्वाती शेरेकर यांना यावर्षी ‘जिजाऊ लेक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रभारी कुलसचिव डॉ. नितीन कोळी व अधिष्ठाता डॉ. मोना चिमोटे यांच्या हस्ते गौरव प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना डॉ. स्वाती शेरेकर म्हणाल्या की, विद्याथ्र्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा वारसा पुढे न्यावा. इन्क्युबेशन सेंटरमार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, मिळालेले अनुदान व स्टार्टअप संधी यांची माहिती देत त्यांनी विद्यार्थ्यांना स्टार्टअप सुरू करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. श्रीकांत पाटील यांनी केले. विद्यापीठ गीत व महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. आदित्य पुड, तर आभार प्रा. अनघा देशमुख यांनी मानले.
या कार्यक्रमास विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
