अमरावती विद्यापीठाच्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ कब्बडी (महिला) क्रीडा स्पर्धेचे आयोजन
अमरावती शहरात दि २२ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत
पाच राज्यातील विद्यापीठांचे संघ सहभागीय होणार
शिक्षणमहर्षी डॉ पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंतीवर्षानिमित्त आयोजन
अमरावती : शिक्षणमहर्षी डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावतीच्या संयुक्त विद्यमाने दि २२ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ कब्बडी (महिला) क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश राज्यातील ७४ विद्यापीठाच्या चमू सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी अडीच हजार आसन क्षमतेचे प्रेक्षागृह उभारण्यात आले असून ४ मॅटग्राउंडवर एकाच वेळी चार सामने होतील. अमरावतीत प्रथमच या स्पर्धांचे रात्रीच्या वेळी प्रचंड प्रकाशझोतात आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत उद्घाटनानंतर पहिल्या दिवशी ४० सामने खेळल्या जातील.
श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या भव्य क्रीडांगणावर आयोजित या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मंगळवार दि २२ ऑक्टोबरला सायंकाळी ०६:०० वाजता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते यांच्या अध्यक्षतेत होणार असून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख या सोहळ्याचे उद्घाटन करतील. अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा, अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील तर कार्याध्यक्ष व श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले प्रामुख्याने उपस्थित राहतील.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ रवींद्र कडू व डॉ प्रवीण रघुवंशी, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अॅड गजाननराव पुंडकर व अॅड जे व्ही पाटील पुसदेकर, कार्यकारिणी सदस्य प्राचार्य केशवराव गावंडे, सुरेशराव खोटरे व प्रा सुभाष बनसोड व संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ वि गो ठाकरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
या आंतरविद्यापीठ महिला कब्बडी क्रीडा स्पर्धेत देवी अहिल्या विद्यापीठ, इंदोर, गुजरात विद्यापीठ, अहमदाबाद, विक्रम विद्यापीठ, उज्जेन, मारवाडी विद्यापीठ,राजकोट, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, मुंबई विद्यापीठ मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आदी विद्यापीठातील एकूण ७४ विद्यापीठाच्या चमू सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार दि २५ ऑक्टोबर २०२४ ला रात्री ०८:०० वाजता कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते यांच्या अध्यक्षतेत होईल. अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. अमरावती महानगर पालिकेचे आयुक्त सचिन कलंत्रे, प्र- कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष केशवराव मेतकर, कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ, स्वीकृत सदस्य नरेशचंद्र पाटील, डॉ पुरुषोत्तम वायाळ व प्राचार्य डॉ अमोल महल्ले या समारंभाला प्रामुख्याने उपस्थित राहतील.
स्पर्धेचे उद्घाटन ते पारितोषिक वितरण समारंभापर्यंत दररोज रंगारंग कार्यक्रम सादर करण्यात येतील. या स्पर्धेचे आयोजन अत्यंत भव्यदिव्य राहणार आहे. कब्बडीप्रेमी अमरावतीकरांसाठी ही मोठो पर्वणी असल्याने समस्त क्रीडाप्रेमी अमरावतीकरांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा, अशी विनंती आयोजकांनी केली आहे.
पत्रकार परिषदेला पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ कब्बडी (महिला) क्रीडा स्पर्धा समितीचे कार्याध्यक्ष दिलीपबाबू इंगोले, डॉ तनुजा राऊत प्रभारी संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ, संगाबा अमरावती विद्यापीठ, प्राचार्य डॉ अंबादास कुलट, संयोजक डॉ सुभाष गावंडे, जनसंपर्क अधिकारी विलास नांदुरकर व डॉ कुमार बोबडे यांची उपस्थिती होती.