अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी-२०२४ लेखी परीक्षेच्या पर्यायी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
विद्यार्थ्यांनी नोंद घेण्याचे विद्यापीठाचे आवाहन
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी-२०२४ लेखी परीक्षेच्या पर्यायी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून क्रीडा/ सांस्कृतिक/ अविष्कार/ आव्हान/ उत्कर्ष इत्यादी स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या व विद्यापीठाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेल्या विद्यार्थ्यांच्या विद्यापीठीय पर्यायी परीक्षा दि २२ जुलै, २०२४ पासून अमरावती, खामगांव, यवतमाळ व वाशिम या परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहेत.
अमरावती जिल्ह्रातील विद्यार्थ्यांची परीक्षा ब्राजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालय, अमरावती (केंद्र क्र १२५), बुलडाणा जिल्ह्रातील विद्यार्थ्यांची परीक्षा जी एस महाविद्यालय, खामगांव (केंद्र क्र ३०१), यवतमाळ जिल्ह्रातील विद्यार्थ्यांची परीक्षा लोकनायक बापुजी अणे महिला महाविद्यालय, यवतमाळ (केंद्र क्र ४१२), वाशिम जिल्ह्रातील विद्यार्थ्यांची परीक्षा आर ए महाविद्यालय, वाशिम (केंद्र क्र ७०१), तर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा त्यांच्या प्रवेशपत्रावरील केंद्रानुसार त्याच परीक्षा केंद्रांवर घेण्यात येईल.
विद्यार्थ्यांना देण्यात आलेले परीक्षा क्रमांक व प्रवेशपत्र पर्यायी परीक्षेकरीता कायम राहतील. तसेच वेळापत्रक व परीक्षा केंद्रानिहाय रोललिस्ट विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. यासंदर्भात प्राचार्य, केंद्राधिकारी, सर्वसंबंधित महाविद्यालये, परीक्षा केंद्रांना पत्राव्दारे कळविण्यात आले असून विद्यार्थ्यांना याची जाणीव करुन द्यावी, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ नितीन कोळी यांनी कळविले आहे. काही अडचण असल्यास परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ नितीन कोळी यांना 9850042357 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे विद्यापीठाच्या वतीने कळविण्यात येत आहे.