माजी विद्यार्थी व टाटा फंडामेंटल रिसर्च सेंटरचे प्रो विवेक पोलशेट्टीवार यांचा अमरावती विद्यापीठाच्या वतीने प्रेरणादायी सत्कार
मार्ग सोडू नका; लक्ष्य साधून स्वप्न पूर्ण करा
विज्ञान युवा शांती स्वरुप भटनागर पुरस्कारप्राप्त डॉ पोलशेट्टीवार यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
अमरावती : कठोर परिश्रमाशिवाय फळ नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनो, मार्ग सोडू नका, लक्ष्य साधून आपले स्वप्न पूर्ण करा, असे आवाहन विज्ञान युवा शांतीस्वरुप भटनागर पुरस्कारप्राप्त डॉ विवेक पोलशेट्टीवार यांनी विद्यार्थ्यांना केले. डॉ विवेक पोलशेट्टीवर मूळचे यवतमाळ जिल्ह्रातील रहिवाशी आहेत व संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे ते माजी विद्यार्थी असून सध्या ते मुंबई येथील टाटा फंडामेंटल रिसर्च सेंटर येथे प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत.
रसायनशास्त्रात त्यांनी केलेल्या संशोधनाला केंद्र शासनाचा विज्ञान युवा शांती स्वरुप भटनागर पुरस्कार मिळाला असून नुकतेच त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असलेले प्रो विवेक पोलशेट्टीवार यांचा आज अॅल्युमनी असोसिएशन व विद्यापीठाच्यावतीने शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन प्रेरणादायी सत्कार करण्यात आला, याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे, माजी प्र-कुलगुरू डॉ वसंत जामोदे, प्रमुख अतिथी म्हणून अधिसभा तथा व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ प्रवीण रघुवंशी, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ प्रशांत गावंडे, अॅल्युमनी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ सुशील काळमेघ, सचिव डॉ गजानन मुळे, व्यवस्थापन परिषद सदस्य तथा रसायनशास्त्राच्या प्रा डॉ मनिषा कोडापे, डॉ जागृती बारब्दे उपस्थित होते.
डॉ पोलशेट्टीवार विद्यार्थ्यांना आवाहन करतांना म्हणाले, सदैव सकारात्मक विचार ठेवा. चांगले शिक्षणच नाही, तर योग्य मार्गदर्शनही विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे. अशाच पाठबळामुळे मी यश प्राप्त करु शकलो. विज्ञान युवा शांती स्वरुप भटनागर पुरस्कार हा आपल्या आयुष्यातील अतिशय महत्वाचा क्षण असल्याचेही ते म्हणाले.
प्रमुख अतिथी डॉ प्रवीण रघुवंशी म्हणाले, डॉ विवेक पोलशेट्टीवार यांना संशोधन क्षेत्रात मिळालेला सर्वोत्कृष्ट पुरस्कार हा विद्यापीठ व सर्वांसाठी अतिशय अभिमानास्पद आहे. या माध्यमातून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाचा जगभरात नावलौकीक झाला आहे. विद्यार्थ्यांनी यापासून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. माजी प्र-कुलगुरू डॉ वसंत जामोदे म्हणाले, डॉ विवेक पोलशेट्टीवार यांचा विद्यापीठात शिक्षण घेत असतांनाच हुशार विद्यार्थी म्हणून नामोल्लेख केला जात होता.
विद्यार्थ्यांनीही कठोर परिश्रम करावेत, नेहमी स्पर्धेत रहावे, भविष्य घडविण्यासाठी ते आवश्यक आहे, असे सांगून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा सर्वत्र नावलौकीक असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला. प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे म्हणाले, हा अतिशय अभिनंदनीय असा क्षण आहे. विद्यार्थ्यांनी प्रो डॉ विवेक पोलशेट्टीवार यांच्या कार्याची प्रेरणा घ्यावी. याप्रसंगी डॉ प्रशांत गावंडे, डॉ सुशील काळमेघ, डॉ मनिषा कोडापे यांनीही मनोगत व्यक्त केले.
विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी विद्यापीठाचे सतत प्रयत्न – कुलगुरू डॉ मिलींद बारहाते
नवीन शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडत आहे. वर्गात शिक्षण घेत असतांना पुढे त्याचे काय असा प्रश्न होता, मात्र नवीन शैक्षणिक धोरणामुळे आता विद्यार्थ्यांना वर्गात शिकलेले प्रत्यक्ष कृतीत उतरविता येणार आहे व विद्यार्थी घडविण्यासाठी विद्यापीठाचे सातत्याने प्रयत्न सुरू असून पदवीपूर्व पातळीवरच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) चे शिक्षण, त्याचबरोबर इन्स्टिट्युशनल डेव्हलपमेंट प्लॅन सुध्दा विद्यापीठाकडून तयार करणे सुरु असल्याचे सांगून माजी विद्यार्थ्यांनी सुध्दा पुढाकार घेऊन सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत कार्यरत असलेल्या डॉ माधवी ठाकरे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थीनी असून चांद्रयान यशस्वीतेमध्येही त्यांची मोठी भूमिका राहिल्याचा उल्लेखही कुलगुरू डॉ बारहाते यांनी याप्रसंगी केला.
संत गाडगे बाबा व मॉ सरस्वती पूजन आणि विद्यापीठ व महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक तसेच सन्मानपत्राचे वाचन डॉ जागृती बारब्दे यांनी केले. सूत्रसंचालन श्रावणी बावनेर हिने, तर आभार डॉ गजानन मुळे यांनी मानले. कार्यक्रमाला माजी प्र-कुलगुरू डॉ प्रसाद वाडेगावकर, आजीवन अध्ययन विभागाचे संचालक डॉ श्रीकांत पाटील, रसायनशास्त्र विभागाचे माजी विद्यार्थी -विद्यार्थीनी तसेच बॉटनी व रसायनशास्त्र विभागातील विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.