अमरावती विद्यापीठाच्या कोलोनियल व पोस्ट कोलोनियल लिट्रेचर विषयाची पुनर्परीक्षा १६ ऑगस्ट रोजी होणार
विद्यापीठाची उन्हाळी-2024 एम ए (इंग्रजी) सेमि-4 (सी बी सी एस) मधील
विद्यार्थ्यांनी नोंद घेण्याचे विद्यापीठाचे आवाहन
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी-2024 एम ए (इंग्रजी) सेमि-4 (सीबीसीएस) परीक्षेमधील कोलोनियल व पोस्ट कोलोनियल लिट्रेचर विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न विचारल्याबाबतची तक्रार विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे केली होती. प्राप्त तक्रारीवर विद्यापीठ प्राधिकारिणींनी घेतलेल्या निर्णयानुसार सदर विषयाची पुनर्परीक्षा दि 31 जुलै, 2024 रोजी दुपारी 2:00 ते 5:00 या वेळेत घेण्यात आली.
मात्र अनेक विद्यार्थी महाविद्यालयांकडून माहिती न मिळाल्याने परीक्षेपासून वंचित राहिल्याची विद्यार्थ्यांची तक्रार विद्यापीठाकडे प्राप्त झाली होती. त्यामुळे आता सदर विषयाची पुनर्परीक्षा दि 16 ऑगस्ट, 2024 रोजी विद्यार्थ्यांना यापूर्वीच देण्यात आलेल्या परीक्षा केंद्रांवर घेण्यात येईल. तसेच सदर परीक्षेकरीता यापूर्वीच निर्गमित करण्यात आलेले प्रवेशपत्र व परीक्षा क्रमांक कायम राहतील. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी 31 जुलै रोजीची परीक्षा दिली आहे, अशा विद्यार्थ्यांचे त्या परीक्षेचे गुण विचारात घेतले जातील, त्याचबरोबर जे विद्यार्थी उपरोक्त परीक्षा देऊनही 16 ऑगस्ट रोजीची परीक्षा देऊ इच्छितात, त्यांना सदर परीक्षेची मुभा आहे. मात्र अशा विद्यार्थ्यांचे 16 ऑगस्ट रोजीच्या परीक्षेचे गुण विचारात घेतले जातील व 31 जुलै रोजी दिलेली परीक्षा रद्द समजण्यात येईल, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ नितीन कोळी यांनी कळविले आहे.
यासंदर्भात सर्वसंबंधित महाविद्यालये व परीक्षा केंद्रांना परीक्षा विभागातर्फे पत्राव्दारे कळविण्यात आले असून संबंधित विद्यार्थ्यांना याबाबत महाविद्यालयांनी तातडीने अवगत करावे. तसेच विद्यार्थ्यांनी सुध्दा आपापल्या महाविद्यालयांशी संपर्क साधावा व काही अडचण असल्यास परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ नितीन कोळी यांचेशी 9850042357 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे विद्यापीठाच्या वतीने कळविण्यात येत आहे.