शिवाजी विद्यापीठातील वाणिज्य अधिविभागात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न
विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित केल्यास करीयरच्या संधी – प्रा डॉ ए एम गुरव
कोल्हापूर : विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना ध्येय निश्चित केल्यास करियरच्या संधी प्राप्त होतील, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठातील वाणिज्य अधिविभागाचे विभागप्रमुख प्रा डॉ ए एम गुरव यांनी केले.

शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्रातील बी ए, बी कॉम, एम ए, एम कॉम,एम एस्सी (गणित) व एम बी ए या अभ्यासक्रमातील शैक्षणिक वर्ष २०२३ -२४ मधील विद्यार्थ्यासाठी ऑनलाइन आयोजित केलेल्या माजी विद्यार्थ्यांचा मेळाव्यात ‘पदवी व पदवीव्युतर नंतरचे करियर’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्राचे संचालक प्रा डॉ डी के मोरे होते. उपकुलसचिव व्ही बी शिंदे उपस्थित होते.
प्रा डॉ गुरव म्हणाले की, पदवी व पदव्युत्तर शिक्षणानंतर सेवा, व्यापार, सल्ला, शिक्षण व स्पर्धा परीक्षा रोजगाराच्या अनेक संधी आहेत. आपण घेतलेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमावर निगडीत कौशल्याधारित हजारो अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यासाठी शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित केले पाहिजे. विविध क्षेत्रांमध्ये करियर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी स्वतःची कमतरता, बलस्थाने शोधली पाहिजेत.
विद्यार्थ्यांनी ज्या अभ्यासक्रमातून पदवी अथवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे, अश्या सामाजिकशास्त्रे, भाषा, शिक्षण, विज्ञान, कृषी, तंत्रज्ञान, फिल्म, मिडिया, नेव्ही, बँका, इन्सुरन्स, सायबर, व्यापार, हॉटेलिंग, टुरिझम, गणित, सल्लागार आदि क्षेत्रांमध्ये कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम पूर्ण केले तर रोजगाराच्या संधी प्राप्त होतील, असे प्रा डॉ गुरव यांनी सांगितले.
यावेळी स्वागत व प्रास्ताविक समन्वयक प्रा डॉ कृष्णा पाटील यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख सहा प्रा सुशांत माने यांनी करून दिली. सूत्रसंचालन सहा प्रा डॉ प्रकाश बेळीकट्टी यांनी केले व आभार सहा प्रा डॉ नितीन रणदिवे यांनी केले.