एमजीएम विद्यापीठात माजी विद्यार्थी संवाद सत्र उत्साहात संपन्न
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयातील (जेएनईसी) संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभाग आणि इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने माजी विद्यार्थी संवाद सत्राचे आयोजन उत्साहात पार पडले. हे सत्र ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या परिषद सभागृहात पार पडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालिका डॉ. शर्वरी तामणे यांनी करताना विद्यापीठाच्या अभ्यासक्रम रचनेतील नावीन्य, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आणि एमजीएम संस्थेचा तीन दशकांचा प्रवास यावर सविस्तर प्रकाश टाकला.

संवाद सत्रात देश-विदेशातील नामांकित माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उद्योग क्षेत्रातील सध्याचे ट्रेंड्स, आवश्यक कौशल्ये आणि नविन तंत्रज्ञान यावर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी उद्योग क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कोणत्या प्रकारच्या कौशल्यांचा विकास आवश्यक आहे यावर माजी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले. उद्योग आणि महाविद्यालय यातील सहकार्याचे नवीन मार्ग शोधण्याबाबतही सत्रात सखोल चर्चा झाली.
कार्यक्रमानंतर माजी विद्यार्थ्यांनी कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांची भेट घेऊन उद्योग-शिक्षण सहकार्याबाबत चर्चा केली. यामध्ये एमजीएम विद्यापीठाच्या धोरणात्मक विकासाची दिशा अधोरेखित करण्यात आली.
संवाद सत्रात सहभाग घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांमध्ये:
- डॉ. स्वाती जाधव – डेटा सायंटिस्ट, इन्फिनियम यूके लि., इंग्लंड
- गीतांजली जगताप – ग्रुप मॅनेजर, ग्लोबल क्रायसिस मॅनेजमेंट, मुंबई
- स्मिता मलानी – उद्योग-शिक्षण समन्वयात सक्रीय सहभाग
- सोनाली पानसरे – अमेरिकास्थित माजी विद्यार्थी नेटवर्कमधील सक्रीय सदस्य

यांच्यासह विभागप्रमुख प्रा. दीपा देशपांडे व सर्व संबंधित प्राध्यापक उपस्थित होते.
या संवाद सत्रामुळे माजी विद्यार्थी आणि वर्तमान विद्यापीठ यांच्यातील नाते अधिक बळकट झाले असून, भविष्यातील उद्योग सहकार्याच्या संधींना चालना मिळणार आहे.