विद्यार्थ्यांचा सर्वंकष विकास होणे महत्त्वाचे: कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर
क्रीडा महोत्सवातील विजेत्या खेळाडूंचा केला सन्मान
सोलापूर : पुस्तकी ज्ञानाबरोबरच मैदानी स्पर्धेत तसेच कलेमध्ये देखील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे हा महत्त्वाचा असतो. यासाठी विद्यार्थ्यांना दर्जेदार क्रीडांगणे, पायाभूत सुविधा तसेच गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी दिली. महामहीम राज्यपाल कार्यालय आयोजित राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या ॲथलेटिक्स विभागातील खेळाडूंनी ऐतिहासिक आणि दैदिप्यमान कामगिरी केली आहे. सात सुवर्ण आणि दोन रौप्य पदकासह मुलांच्या ॲथलेटिक्स संघाला सर्वसाधारण तृतीय विजेतेपद मिळाले आहे. यानिमित्त कुलगुरू प्रा. महानवर यांनी खेळाडू विद्यार्थ्यांचा आणि संघप्रमुखांचा सन्मान केला. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत बसवराज दामा, कुलसचिव योगिनी घारे, क्रीडा विभागाचे प्रभारी संचालक डॉ. केदारनाथ काळवणे उपस्थित होते.
कुलगुरू प्रा. महानवर म्हणाले की, यंदा क्रीडा महोत्सव हा दोन टप्प्यात होत आहे. यातील नागपूर येथे अर्धा महोत्सव पार पडला. यामध्ये दहा पारितोषिके विद्यापीठास प्राप्त झाली आहेत. आता अर्धा महोत्सव हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणारे येथे होत आहे. यामध्येही आपणास भरपूर पारितोषिके मिळण्याची अपेक्षा आहे. खेळाडू विद्यार्थ्यांनी चांगले सादरीकरण करून यश मिळवले आहेत. ही विद्यापीठासाठी गौरवाची गोष्ट आहे. या विद्यार्थ्यांना येत्या काळात चांगल्या सुविधा प्राप्त करून देण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील राहील, असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी खेळाडू विद्यार्थिनी संतोषी देशमुख, संघप्रमुख डॉ. किरण चोकाककर, संघ समन्वयक डॉ. अशोक पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तेजस्विनी कांबळे यांनी केले तर आभार सहायक कुलसचिव सोमनाथ सोनकांबळे यांनी मानले.