अलार्ड युनिव्हर्सिटी तर्फे ‘अलार्ड स्कूल ऑफ लॉ’ चे मोठ्या उत्साहात उद्घाटन
“भारतीय संविधान हाच खरा धर्म आहे” – न्यायाधीश प्रसन्न बी वरळे यांचे विचार
पुणे : “भारतीय संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. समाजात वावरतांना सर्व धर्मांचा आदर सन्मान करणे हे आमचे कर्तव्य आहे. परंतू जेव्हा समाजात वावरतो तेव्हा संविधान हाच खरा धर्म असतो. त्याचे आचरण करणे हेच धर्म आचरण आहे.” असे विचार सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रसन्न बी वरळे यांनी व्यक्त केले.
अलार्ड युनिव्हर्सिटी तर्फे नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘अलार्ड स्कूल ऑफ लॉ’ चे उद्घाटन वरळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
पुणे येथील प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज एम के महाजन हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. अलार्ड विद्यापीठाचे कुलाधिपति डॉ एल आर यादव हे अध्यक्षस्थानी होते. तसेच विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ पूनम कश्यप व डॉ राम यादव उपस्थित होते.
तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ एस बी बखारिया, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे माजी कार्याध्यक्ष व सदस्य अॅड राजेंद्र उमाप उपस्थित होते.
यावेळी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष संतोष खामकर, पिंपरी चिंचवड बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड रामराजे भोसले पाटील यांनी न्यायाधीश प्रसन्न वरळे यांचा विशेष सत्कार केला.
प्रसन्न वरळे म्हणाले,” डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्यानुसार शिक्षण ही प्रगतीची शक्ती आहे. त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा उपयोग ग्रामीण जनतेसाठी करावा. पुणे जसे शिक्षणाचे माहेर घर आहे तसेच संतांचे ही माहेर घर आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ओवीनुसार ‘इवलेसे रोप लावियले द्वारी, त्याचा वेलू गेला गगणावरी’ या नुसार येथे नव्याने सुरू करण्यात आलेली विधी शाखा सर्वोत्कृष्ट बनेल.”
डॉ एल आर यादव म्हणाले,”हम अलग है, हम अलार्ड या नुसार विधी शाखेतील विद्यार्थ्यांना आम्ही पुस्तकां बरोबरच ७० टक्के प्रॅक्टिकल ज्ञान देण्यावर भर देऊ. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करू. जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम गरजेचे आहे. येणार्या काळात युवकांसाठी या विद्यापीठातून उत्तम दर्जाचे शिक्षण दिले जाईल.”
पूनम कश्यप म्हणाल्या, “ज्ञान हे यशाची गुरुकिल्ली आहे. सकारात्मक विचारधारेच्या आधारे समाजात बदल घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना विधीचे योग्य ज्ञान दिले जाईल. समाजातील आव्हानांचा सामना करून विद्यार्थ्यांचे करियर घडविण्यासाठी त्यांना रायटिंग स्किल, लिगल इश्यू, लिडरशीप सारखे गुणवत्ता वृद्धीवर अधिक भर दिला जाईल.”
वर्तमान काळात उत्तम दर्जाच्या विधी शाखेची आवश्यकता आहे. त्यातच अलार्ड विद्यापीठाने सुरू केलेला हा कोर्स नक्कीच विद्यार्थ्यांच्या जीवनात यशाचे द्वार उघडे करेल. असे विचार एम के महाजन यांनी व्यक्त करून शुभेच्छा दिल्यात.
डॉ भूपिंन्दर कौर यांनी सूत्रसंचालन व सारीका यांनी आभार मानले.