ए आय विद्यापीठ; एकदम लांब उडी, उंच उडी?
डॉ विजय पांढरीपांडे
सरकारने एकदम ए आय विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घोषित करून टाकलाय ! आधी रांगणे,चालणे,धावणे शिकायचे असते.मग लांब उडी, उंच उडी घ्यायची असते. पण घोषणा, घिसाड घाई, अती उत्साह हा कुठल्याही सरकारचा गुणधर्म असतो. त्यामुळे मूळ उद्देश चांगला असला तरी परिणामांच्या दृष्टीने योजना मात्र फसतात. (नोट बंदी हे त्याचे उत्तम उदाहरण!). आता ए आय च्या बाबतीत तेच होते आहे. जग नाचते म्हणून आपली क्षमता, गरज न बघता आपणही नाचायचे असा हा प्रकार. यामुळे एक धड न भराभर चिंध्या अशी अवस्था होते!

ए आय साठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याची काय गरज आहे? आधीच तीन चार वर्षा पूर्वी सर्व इंजिनियरिंग कॉलेजेस मध्ये ए आय, एम एल, डेटा सायन्स चे स्वतंत्र पदवी विभाग सुरु झाले. त्यात हजारो लाखो प्रवेश झालेत. त्याची काय अवस्था आहे? त्यांना कुठल्या नोकऱ्या मिळाल्या, मिळणार? तिथे काय नवे संशोधन सुरू आहे? विषय नीट शिकविणारे प्राध्यापक तरी त्या विभागात आहेत का? हे नवे विभाग सोडा, मूळ आधी पासून कार्यरत असलेल्या कॉम्पुटर सायन्स, आय टी पदवी विभागाची काय अवस्था आहे? त्या विभागानी तरी संगणक,आय टी, ए आय मध्ये स्टेट ऑफ द आर्ट प्रयोग शाळा उभारल्या आहेत का?
जगमान्य झाले, आंतर राष्ट्रीय स्तरावर वाखाणल्या गेले असे संशोधन झाले का कुठे आपल्या कडे? मी अनेक संस्थांचे ॲकडमिक ऑडिट केले असल्याने सद्य परिस्थिती वर आधारित ठामपणे सांगू शकतो, की या प्रश्नाचे उत्तर नगण्य अपवाद वगळता नकारार्थी आहे. मुळात ए आय, एम एल, वगैरे विषय पदवीचे, पी एच डी चे नाहीत. ते ॲप्लिकेशन, स्किल डेवलोपमेट चे विषय आहेत. मुळात केमिकल इंजिनियर असलेले अच्युत गोडबोले, पदवी पी एच डी नसताना अनेक आय टी कंपन्याचे संचालक झालेत. त्यांनी संगणकाचे टेक्स्ट बुक लिहिले. मराठीत सोप्या भाषेत पुस्तके लिहिली.
आय आय टी तील एक लेक्चरर संगणकाची पदवी पी एच डी नसताना त्या विभागात प्रोफेसर, विभाग प्रमुख झाले. हे विषय स्वतः शिकून कौशल्य संपादन करण्याचे आहेत. त्याचे स्वतंत्र विद्यापीठ हा हास्यास्पद,घातक,निरर्थक,खर्चिक निर्णय आहे.या विद्यापीठात म्हणे मोठमोठ्या कंपनीतील आय टी तज्ञ शिकवतील! ज्यांना आपल्या प्रोजेक्ट डेड लाईन मुळे बायको मुलाकडे,घराकडे लक्ष द्यायला,खाजवायला देखील फुरसत नसते,ते मामुली मानधनात या मुलांना( ज्यांना अभ्यास, ज्ञान संपादन यात स्वारस्य नाही) शिकवण्यात वेळ वाया घालवणार? आजकाल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना इंटर्न शिप साठी मार्गदर्शन करायला यांना वेळ नसतो ते पूर्ण आधुनिक विषय( तेही स्वतः त्यात पदवीधर नसताना) कसे शिकवणार? उचलली जीभ लावली टाळ्याला अशी ही अविचारी,अव्यवहारी,निरुपयोगी घोषणा आहे.
संगणक ओळख आजकाल शाळेतच सुरू झाली आहे.इंजिनियरिंग कॉलेजात ए आय एम एल डेटा सायन्स चे पदवी अभ्यासक्रम सुरू झाले आहेत.( खरे तर ही निर्णय माझ्या मते चुकीचाच होता,आहे).या विभागात ना तज्ञ प्राध्यापक, ना उत्तम संगणक,प्रयोगशाळा.संशोधन कोण कशावर कुणाच्या मार्ग दर्शनात करणार? तेच जुने कॉम्पुटर सायन्स चे विषय शिकवायचे अन् शेवटी ई आय एम एल ची फोडणी द्यायची अशी फसवेगिरी सुरू आहे नव्या पदव्याच्या नावाखाली.लाखो रुपये फी आकारून,मूर्ख सुशिक्षित पालकांना नादी लावून संस्था चालकांनी मात्र आपल्या तिजोऱ्या भरल्या आहेत! हाही एक प्रकारचा शैक्षणिक भ्रष्टाचारच आहे.
हे सारे करण्या ऐवजी या विषयाची ओळख करून देणारे काही क्रेडिट चे कोर्सेस सुरू करा.महाविद्यालय, सर्व पदवी,पदव्युत्तर विभागात संगणक विभागातर्फे हे स्किल डेव्हलपमेंट स्वरूपाचे कोर्सेस,प्रॅक्टिस सेशंस सुरू करा.त्यामुळे इंटरेस्ट निर्माण होईल मुलांमध्ये. ए आय संबधात जागतिक पातळीवर प्रचंड गोंधळ सुरू आहे.कमालीची अनिश्चितता आहे.मुळात कृत्रिम बुध्दीमत्ता हे नावच चुकीचे आहे.मानवी बुद्धिमत्तेला हा पर्याय असू शकत नाही.फार तर याला न मानवी बुध्दीमत्ता म्हणता येईल.परमेश्वर निर्मितीला आव्हान देणे,त्याने जे मानवाला निर्माण करून केले ते आपणही यंत्राद्वारे करू शकतो हा दावा करणे हे अहंपणाचे लक्षण आहे.जी गुंतागुंतीची उदाहरणे मानवाला सोडवायला अत्यंत कठीण,मुख्य म्हणजे वेळ खाऊ, ती संगणक ए आय चा वापर करून चुटकी सारखी सोडवेल.प्रचंड डेटा चे अचूक विश्लेषण काही सेकंदात, मिनिटात करेल.पण भावना,विवेक, अंत प्रेरणा यावर आधारित घ्यावयाचे मानवी निर्णय ए आय संगणक प्रणालीला कठीण,खरे तर अशक्य ठरणार आहे. प्रा हारारी यांनी यावर प्रगाढ संशोधन,अभ्यास करून विचार करण्यालयक पुस्तकं लिहिली आहेत.पण कसलेही वाचन ,चिंतन ने करता घोषणा करण्याची हौस असणाऱ्या सरकारला समजावणार कोण हाही प्रश्न आहे.अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले तज्ञ निर्णय प्रक्रियेत सामील असले की यापेक्षा वेगळे काय होणार?
आजूनही आठवीच्या मुलांना लिहिता वाचता येत नाही,अनेक शाळांत पुरेसे शिक्षक नाहीत,विद्यापीठात सुसज्ज प्रयोगशाळा नाहीत,संशोधनासाठी निधी नाही,पी एच डी चा बाजार,भ्रष्टाचार सुरू आहे,प्राध्यापकाची शेकडो पदे रिक्त आहेत,विद्यार्थी वर्गात येत नाहीत,खाजगी महाविद्यालये,विद्यापीठे लाखोंची फी लुटून पदवी ‘दान ‘ करताहेत,दुर्गम खेडेगावात शाळेला रस्ता नाही,आत मुलीसाठी टॉयलेट नाही..अशा बातम्या येत असताना याकडे आधी गांभीर्याने प्राथमिकता समजून लक्ष द्यायचे सोडून थेट ए आय विद्यापीठाची घोषणा करणे म्हणजे धड रांगता चालता येत नाही अन् चालले ऑलिंपिक मध्ये लांब,उंच उडी मारायला,असा हास्यास्पद प्रकार आहे.दुसरे काही नाही.स्पष्ट लिहिलेले अनेकांना आवडणार नाही.पण अशा इन्फेक्शन साठी इंजेक्शन चीच गरज असते!