पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा बजाज फिनसर्व संस्थेशी सामंजस्य करार
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ज्ञानाबरोबर मिळणार प्रशिक्षण
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ज्ञानाबरोबर प्रशिक्षण देण्यासाठी वाणिज्य व व्यवस्थापन क्षेत्रातील बजाज फिनसर्व या संस्थेशी सामंजस्य करार केला. कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या प्रमुख उपस्थितीत या करारावर दोन्ही संस्थांच्या अधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
विद्यापीठाच्या राष्ट्रमाता जिजाऊ व्यवस्थापन सभागृहात झालेल्या कराराप्रसंगी प्र-कुलगुरु प्रा. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, बजाज फिनसर्व संस्थेचे वरिष्ठ व्यवस्थापक अजय थकवानी, प्रशिक्षक नितीन बुर्ला तसेच विद्यापीठातील प्लेसमेंट ऑफिसर डॉ. अनिल घनवट, प्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. गौतम कांबळे, डॉ. बी. जे. लोखंडे, प्रा. सचिन गायकवाड, डॉ. विकास पाटील, डॉ. आर. एस. मेंते, विद्यापीठाचे कायदा अधिकारी ऍड. जावेद खैरदी, डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. सदानंद शृंगारे आदी उपस्थित होते.

बँकिंग आणि इन्शुरन्स क्षेत्रामध्ये करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना या सामंजस्य कराराचा उपयोग होणार आहे. या अंतर्गत सर्व विद्याशाखांचे विद्यार्थी हा कोर्स करू शकतात. नवीन शैक्षणिक धोरणा अंतर्गत या कोर्सला भविष्यात चार क्रेडिट मिळू शकतात. या कोर्समध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना बँकिंग, इन्शुरन्स व कम्युनिकेशन स्किल याबाबत ट्रेनिंग दिले जाणार आहे. हे ट्रेनिंग देण्याकरीता नामवंत कंपन्यातील कार्पोरेट ट्रेनर असणार आहेत. तसेच दर सहा महिन्याला पूल कॅम्पस आयोजन करण्याचे नियोजित आहे. या पूल कॅम्पस अंतर्गत देशातील बँकिंग आणि इन्शुरन्समधील विविध अग्रगण्य कंपन्या येतील व हा कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना तेथे नोकरीची संधी उपलब्ध होईल. हा कोर्स पूर्ण भारतभर 18 राज्यांमध्ये विविध विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये सुरू आहे. आतापर्यंत देशभरामध्ये एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी हा कोर्स पूर्ण केला आहे.
अशा या करारामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते, त्यांना प्रशिक्षण मिळते व त्याचा रोजगाराला फायदा होतो, असे मत कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांनी यावेळी व्यक्त केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने बजाज फिनसर्व या संस्थेशी सामंजस्य करार केला. यावेळी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरु प्रा. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, बजाज फिनसर्व संस्थेचे वरिष्ठ व्यवस्थापक अजय थकवानी, नितीन बुर्ला, डॉ. अनिल घनवट, डॉ. आर. एस. मेंते, ऍड. जावेद खैरदी व अन्य.