आश्वासनानंतर कृषि विद्यापीठातील प्रा डॉ मिलिंद अहिरे यांचे उपोषण मागे
राहुरी : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील डॉ मिलिंद अहिरे यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी सपत्नीक सुरु केलेले आमरण उपोषण दि १५ जुलै, २०२४ रोजी संध्याकाळी मागे घेतले आहे. उपोषणकर्त्यांच्या मागणीनुसार सर्व प्राध्यापकांचे पदोन्नतीचे प्रस्ताव कृषि परिषदेकडे पाठविण्याचे प्रशासनाने मान्य केले.
यावेळी उपोषणस्थळी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ पी जी पाटील आणि कुलसचिव अरुण आनंदकर यांनी पुढाकार घेवून सामंजस्याची भुमिका दाखवत उपोषणकर्ते प्राध्यापक डॉ मिलिंद अहिरे आणि त्यांची पत्नी वैशाली अहिरे यांची भेट घेतली व उपोषणावर तोडगा निघण्यासाठी सकारात्मक चर्चा केली. तरी उपोषणकर्त्यांच्या मागण्यांसंदर्भात लवकरात लवकर सकारात्मक तोडगा काढण्यात येईल असे प्रशासनाच्या वतीने त्यांना आश्वासीत करण्यात आले. आश्वासन मिळाल्यानंतर डॉ मिलिंद अहिरे यांनी उपोषण सोडण्याचे मान्य केले.
यावेळी कुलगुरु डॉ पी जी पाटील आणि कुलसचिव अरुण आनंदकर यांनी उपोषणकर्त्यांना नारळ पाणी देवून उपोषण सोडविले. डॉ मिलिंद अहिरे हे त्यांच्या मागण्यांसाठी दि १० जुलै, २०२४ पासून विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीजवळ पत्नीसह उपोषणास बसले होते. विद्यापीठाच्या मध्यवर्ती परिसरातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी डॉ अहिरे यांच्या उपोषणाविरोधात दि १५ जुलै, २०२४ मुक मोर्चा देखील काढला होता.