शिवाजी विद्यापीठात समन्वयक व लेखनिकांसाठीच्या प्रवेश प्रक्रिया कार्यशाळा संपन्न
दूरशिक्षण आजची गरज : डॉ.पडवळ
कोल्हापूर : दूरशिक्षण पद्धतीतून अद्यावत शिक्षण दिले जात असल्याने दूर शिक्षण ही आजची गरज बनत चालली आहे, असे मत शिवाजी विद्यापीठातील सेंट्रल ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. आर. डी. पडवळ यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने आयोजित महाविद्यालयातील दूरशिक्षण अभ्यास केंद्रातील समन्वयक व लेखनिकांसाठीच्या प्रवेश प्रक्रिया कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संचालक प्रा. डॉ. डी.के.मोरे होते.
डॉ.पडवळ म्हणाले की, विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन याचबरोबर संवाद कौशल्य शिकवल्यास विद्यार्थ्यांचा दूरशिक्षण केंद्राकडे कल वाढेल. दूरशिक्षण पद्धतीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी हे नोकरी करणारे, नोकरी न करणारे, नोकरी करीत नाहीत पण स्पर्धात्मक परीक्षेत सहभाग घेणारे आणि स्वतंत्र उद्योग करू पाहणारे विद्यार्थी असतात. त्यामुळे त्यांना कौशल्यावर आधारित शिक्षण दिल्यास रोजगाराभिमुख व्यक्तिमत्व तयार होईल.
अध्यक्ष प्रा.डॉ.डी. के.मोरे म्हणाले की, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने शिक्षणाचा राष्ट्रीय विकास दर वाढवण्याबाबतचा दृष्टिकोन समोर ठेवून अपूर्ण शिक्षण असणाऱ्यांना व शिक्षणापासून वंचित असणाऱ्या घटकांना शिक्षण देण्याचे काम दूरशिक्षण केंद्र करीत आहे.सर्व अभ्यासकेंद्रांना सर्वतोपरी सहकार्य दूरशिक्षण केंद्राचे राहील असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी उपकुलसचिव श्री.सी.एस. कोतमिरे आय टी विभागाचे श्री. शशी हुक्केरी, सहा.कुलसचिव उदय करवडे, विश्वास शिरोळे, नितिन सालोखे, विश्वनाथ वरुटे उपस्थित होते. यावेळी संगणक विभागाचे संचालक डॉ.ए. ए.रेडेकर, सिस्टीम प्रोग्रामर श्री. आशिष घाटे यांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे बाबत मार्गदर्शन केले. तसेच डॉ.पी. एस.लोंढे यांनी एबीसी आयडी तयार करणे बाबत व डॉ.पी.एस. देवळी यांनी दुहेरी पदवी अर्ज भरणे बाबत प्रात्यक्षिक केले. त्याचबरोबर श्री सतीश हुकेरी यांनी ऑनलाईन रिसीट पोर्टल बाबत मार्गदर्शन केले. तसेच अभ्यास केंद्रांच्या कामकाजाबाबत समन्वयक डॉ. के. बी. पाटील यांनी मार्गदर्शन केले.या कार्यशाळेसाठी एकूण 51 अभ्यासकेंद्राने सहभाग घेतला होता.
यावेळी प्रास्ताविक समन्वयक डॉ. के बी पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. दत्तात्रय कमलाकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. परशुराम देवळी यांनी केले. शेवटी आभार डॉ.सी.ए.बंडगर यांनी मांडले