अमरावती विद्यापीठात एम ए जेंडर अँड वुमेन्स स्टडीज अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील वुमेन्स स्टडीज सेंटर अंतर्गत एम ए जेंडर अँड वुमेन्स स्टडीज या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षांचा असून त्यात एकूण चार सत्र आहेत. अभ्यासक्रमासाठी मराठी/ हिंदी/ इंग्रजी तिन्ही भाषांचे माध्यम उपलब्ध आहेत. कुठल्याही शाखेतील पदवी प्राप्त विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतो .लिंगभाव दृष्टीकोनातून समाजातील स्त्री प्रश्नांचे पर्यायाने लिंगाधारित असमानतेच्या आंतरसंबंधांचे चिकित्सक अध्ययन करण्यावर या अभ्यासक्रमात भर दिला जातो.
लिंगभेदाचे उच्चाटन करून लैंगिक समानता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक असणारे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय भान व कौशल्ये विकसित करण्यावर या अभ्यासक्रमात लक्ष देण्यात येते. लैंगिक समानतेवर आधारित नीती व धोरण निर्माणासाठी आवश्यक ज्ञान व दृष्टीकोन देणारा हा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमात शिक्षण, इतिहास, साहित्य, संस्कृती, प्रसारमाध्यमे, आरोग्य, आर्थिक घडामोडी व विकास प्रक्रिया, जात, वर्ग, पितृसत्ता यांसह अन्य सामाजिक व्यवस्था, कायदे व न्यायप्रणाली, सरकारी योजना व धोरणे, स्त्रीवाद, सामाजिक चळवळी, गैर शासकीय संस्था इत्यादिंचा लिंगभाव दृष्टीकोनातून अभ्यास समाविष्ट आहे.
सोबतच नवीन शैक्षणिक धोरणानुसार हा अभ्यासक्रम अद्ययावत करण्यात आलेला असून त्या अंतर्गत संशोधन प्रकल्प, क्षेत्रभेटी, व्यष्टी अध्ययन, इंटर्नशिप यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये रोजगाराभिमुख कौशल्ये विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जातात. शासकीय, सामाजिक आणि खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. शासनाच्या महिला व बालविकास विभागासह विविध विभागांमध्ये आणि युनायटेड नेशन्स द्वारा राबवण्यात येणारे प्रकल्प आणि एनजीओ अशा विविध क्षेत्रांत उपलब्ध असणाऱ्या रोजगार संधींसाठी प्रत्यक्ष आणि काही ठिकाणी पूरक असणारा हा अभ्यासक्रम आहे. युपीएससी, एमपीएससी यांसह विविध स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील घटक अतिशय पूरक आहेत.
याशिवाय जेंडर ट्रेनर, प्रोग्राम मॅनेजर, रिसर्च असोसिएट / असिस्टंट यांसारख्या अनेक क्षेत्रातील पदांसाठी अभ्यासक्रमाची पदवी आवश्यक व उपयुक्त आहे. भ्यासक्रमासाठी अत्यल्प प्रवेश शुक्ल असून शिष्यवृत्ती (शासकीय नियम व अटींनुसार), विद्यार्थीकेंद्री सुरक्षित व सुविधांयुक्त शैक्षणिक परिसर, वसतिगृह सुविधा व समृद्ध ग्रंथालय सेवा (पूर्ण वेळ वाचन कक्षासह), संगणक व इंटरनेट सुविधा, अनुभवी शिक्षकांचे पूर्णवेळ शैक्षणिक मार्गदर्शन व सहकार्य, क्रीडा सुविधा, स्टेडियम, स्विमिंग पूल, विद्यापीठ परिसरात सायकल सुविधा इत्यादी अनेक सुविधा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने उपलब्ध आहेत. वुमेन्स स्टडीज सेंटर अंतर्गत सातत्याने आयोजित होणाऱ्या कार्यशाळा, परिषदा, चर्चासत्र, परिसंवाद, प्रशिक्षण वर्ग, व्याख्याने, अभ्यास दौरे आदींच्या माध्यमातून विद्यार्थ्याची जीवनदृष्टी घडण्यास, व्यक्तिमत्व विकासास पूरक पर्यावरण उपलब्ध आहे.
शिवाय कार्यक्रम-उपक्रमांमध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तररांवरील मौलिक कार्य करणारे विषयतज्ज्ञ, अभ्यासक, संशोधक, प्रशिक्षक, बुद्धीजीवी, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच शासकीय अधिकारी यांचा विविध सहभाग होत असल्यामुळे विद्यार्थ्यांचा त्यांचे मार्गदर्शन सहज उपलब्ध होते. सेंटरद्वारा चालवण्यात न्यू वेव (इ जर्नल), जेंडर लेन्स (ब्लॉग) यांवर लेखनाची तसेच सेंटरद्वारा चालवण्यात येणाऱ्या युट्यूब चॅनेलवर लिंगभाव दृष्टीकोनातून मांडणी करण्यासाठी विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध आहे.
प्रवेश इच्छुक पात्र व्यक्ती https://sgbauadm.samarth.edu.in/ विद्यापीठाच्या या संकेतस्थळावर जाऊन प्रवेश अर्ज भरू शकतात. मात्र प्रवेश अर्ज यशस्वीरित्या भरल्यावर त्याची एक प्रत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह वुमेन्स स्टडीज सेंटरमध्ये निहित वेळेत जमा करणे अनिवार्य आहे. प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासंदर्भात अधिक माहिती आवश्यक असल्यास त्यांनी वुमेन्स स्टडीज सेंटर, ज्ञान स्त्रोत केंद्र, दुसरा माळा, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ या ठिकाणी भेट द्यावी किंवा मो ९६५७४४९५६५/ ९४०३३९१४२९ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन वुमेन्स स्टडीज सेंटरच्या संचालक डॉ वैशाली गुडधे यांनी केले आहे.