महाराष्ट्र राज्य विद्याशाखा विकास प्रबोधिनी व गोंडवाना विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आनंदवन येथून आदिवासी गौरव यात्रेचा शुभारंभ
अनुभवजन्य शिक्षण माणसाला समृध्द बनवते – प्र-कुलगुरु डॉ श्रीराम कावळे
गडचिरोली : पुस्तकामधून मिळणाऱ्या ज्ञानासोबतच अनुभवजन्य शिक्षण माणसाला समृध्द बनवत असल्याचे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ श्रीराम कावळे यांनी केले. महाराष्ट्र राज्य विद्याशाखा विकास प्रबोधिनी व गोंडवाना विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने प्राध्यापकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आदिवासी गौरव यात्रेचे उद्घाटन प्र-कुलगुरु डॉ श्रीराम कावळे यांच्या हस्ते आनंदवन (वरोरा) येथे करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मृणाल काळे, महाराष्ट्र राज्य विद्याशाखा विकास प्रबोधिनीचे प्रशासकीय व्यवस्थापक शंतनू पवार, आदिवासी गौरव यात्रा उपक्रमाचे सहसमन्वयक रोहित बापू कांबळे उपस्थित होते.
डॉ श्रीराम कावळे म्हणाले, आदिवासी गौरव यात्रेमधून मिळणारे कृतीशील तसेच व्यवहारीक ज्ञान निश्चितच सर्वांना नवी दिशा देणारे ठरेल. केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यवहारीक शिक्षणाची किती नितांत आवश्यकता आहे हे या आदिवासी गौरव यात्रेमधून दिसून येईल. गडचिरोली, चंद्रपूर हा जरी आदिवासी बहुल भाग असला तरी या भागाला, देश नव्हे तर जागतिक पातळीवर ओळख निर्माण करुन देण्याचे कार्य आमटे परिवार, बंग परिवार, देवाजी तोफा यासारख्या महान व्यक्तींनी केले आहे. यांचे कार्य पाहून निश्चितच सर्व प्राध्यापकांना एक सकारात्मक ऊर्जा मिळेल. ही सकारात्मक ऊर्जाच या आदिवासी गौरव यात्रेचे यश असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
हा उपक्रम 15 ते 21 डिसेंबर या कालावधी मध्ये आयोजित करण्यात आला असून राज्यातील विविध महाविद्यालयांमधून 25 प्राध्यापक सहभागी झाले आहेत. या अभ्यास दौऱ्यामध्ये आनंदवन, सोमनाथ, हेमलकसा येथील लोक बिरादरी, सर्च, मेंढा-लेखा येथील उपक्रमांचा अभ्यास करण्यात येणार असल्याची माहिती रोहित बापू कांबळे यांनी प्रास्ताविकामध्ये दिली. विद्यार्थी विकास विभागाचे साहिल धोडरे यांनी स्वागत केले. आभार योगिता कुंभारे यांनी मानले. या उपक्रमाचे सर्व नियोजन समन्वयक डॉ प्रिया गेडाम यांनी केले आहे.
याप्रसंगी आदिवासी गौरव यात्रेमधील सहभागी प्राध्यापक, आनंदवन येथील कर्मचारी उपस्थित होते.