सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात समस्यांचा डोंगर; अभाविप करणार ‘महाआक्रोश मोर्चा’!
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना गंभीर स्वरूपाच्या समस्या भेडसावत आहेत. परीक्षा आणि निकाल विषयातील समस्या, मूलभूत सुविधांचा प्रश्न, संलग्नित महाविद्यालयांमध्ये असलेले प्रश्न आणि शासन स्तरावरील प्रश्नांमुळे सर्वसामान्य विद्यार्थी यामध्ये भरडला जात आहे. वारंवार निवेदन देऊन व चर्चा करून देखील या समस्या न सुटल्याने अभाविप विविध ६१ मागण्यांच्या पूर्ततेसठी पुणे विद्यापीठाविरोधात दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ रोजी ‘महाआक्रोश मोर्चा’ काढणार आहे.
गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाची सुमार कामगिरी बघायला मिळाली आहे. कुठलाही निकाल वेळेत न लागणे, चुकीचे निकाल लागणे, निकाल अचानक बदलून येणे असे अनेक गंभीर प्रकार निदर्शनास आले आहेत. पुनर्मूल्यांकनाच्या विषयात दंडकामध्ये बदल करून विद्यार्थ्यांच्या मूलभूत अधिकारावर गदा आणल्या गेली आहे, शासनाने मुलींसाठी मोफत शिक्षणाची तरतूद केली असताना अनेक महाविद्यालयांनी या योजनेची अंमलबजावणी केलेली नाही, पुणे विद्यापीठ परिसरात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले आहे.
कमवा आणि शिका ही योजना फक्त नावाला सुरू असून गरजू विद्यार्थ्यांना याचा काहीही उपयोग होत नाही. अभ्यासक्रमासाठी वार्षिक वेळापत्रक निश्चित नसल्याने विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बोगस महाविद्यालयांचा सुळसुळाट वाढल्याने अनेक विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे प्रकार घडलेले निदर्शनास आले आहेत. अशा विविध प्रकारच्या समस्यांना घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना घेऊन ‘महाआक्रोश मोर्चा’ काढण्यात येणार आहे.
मोर्चातील प्रमुख मागण्या –
- पुनर्मूल्यांकन पूर्वीच्या पद्धतीने व्हावे. बदललेले निकष तत्काळ रद्द करण्यात यावे.
- सत्र परीक्षा निकाल संदर्भातील गोंधळ दूर करून तत्काळ सुधारित निकाल लावण्यात यावे.
- मुलींना मोफत शिक्षणाच्या योजनेची सर्व महाविद्यालयांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करावी.
- विद्यापीठ परिसरात संघटनांच्या आंदोलन,बैठक, उपक्रम, कार्यक्रम संदर्भातील जाचक नियमवली असलेले परिपत्रक मागे घेण्यात यावे.
- बोगस महाविद्यालयांवर कारवाई करावी.
- वर्षभराचे वेळापत्रक सुरुवातीला जाहीर करण्यात यावे.
- उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत १००/- मध्ये उपलब्ध करून देण्यात यावी.
- विद्यापीठ परिसरातील प्लेसमेंट सेल सक्रिय करण्यात यावे.
- कमवा शिका योजनेचे तास वाढविण्यात यावे. ही योजना सर्व महाविद्यालयांना राबविणे बंधनकारक करण्यात यावी. मानधन ७०/- तास असे असावे.
- विद्यापीठाला पूर्णवेळ कुलसचिव आणि डीन यांची नियुक्ती करण्यात यावी.
- महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार खुल्या महाविद्यालयीन विद्यार्थी परिषद निवडणुका विद्यापीठाने तत्काळ घोषित कराव्या.
अशा विविध ६१ मागण्यांसाठी हा महाआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद करीत आहे.
“सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची परिस्थिती ‘अंधेर नगरी और चौपट राजा’ अशी झाली आहे. कुणाचाच कुणाला ताळमेळ नाही, परीक्षा विभाग संपूर्णपणे डळमळीत झालेला आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या मूलभूत सोयीसुविधांचा प्रश्न निर्माण झालेला आहे, शासनाने निर्णय करून देखील मुलींना मोफत शिक्षणाच्या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत नाही. आंदोलन आणि व्यक्त होण्याचा अधिकार संविधानाने दिलेला असताना पुणे विद्यापीठ हा अधिकार दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. विद्यार्थ्यांचे गंभीर प्रश्न असताना देखील विद्यापीठ प्रशासन या प्रश्नांकडे कानाडोळा करीत आहे. आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत लढा सुरू राहील. हा फक्त अभाविप चा मोर्चा नाही तर सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा मोर्चा आहे”
अथर्व कुलकर्णी
(प्रदेशमंत्री, अभाविप प महाराष्ट्र प्रदेश)