पुणे विद्यापीठाच्या २०% परीक्षा शुल्कवाढीला अभाविपचा तीव्र विरोध
५ दिवसांत कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी परीक्षा शुल्कात तब्बल २० टक्के वाढ करण्याचा घेतलेला निर्णय अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) ने तीव्र शब्दांत धिक्कारला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण पूरस्थिती आणि ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा असल्याचा आरोप अभाविपने केला आहे. २४ सप्टेंबर रोजी विद्यापीठाच्या अधिकार मंडळाच्या बैठकीत ही शुल्कवाढ मंजूर करण्यात आली असून, आधीच जादा आकारले जाणारे छायांकित प्रत व पुनर्मूल्यांकन शुल्क यामध्येही वाढ होणार आहे. या निर्णयाला विरोध दर्शवत अभाविपने परीक्षा संचालकांना निवेदन देऊन तातडीने शुल्कवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे.

अभाविपच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की,
“राज्यातील सामान्य घरातील विद्यार्थ्यांसाठी ही वाढ अवाजवी आणि अन्यायकारक आहे. हा निर्णय म्हणजे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात ढकलणारा आहे. वाढीचा निर्णय त्वरित रद्द करावा.” – राधेय बाहेगव्हाणकर ( अभाविप महानगरमंत्री पुणे )
“वरील विषयात पुढील पाच दिवसांत सकारात्मक कार्यवाही न झाल्यास अभाविप तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारेल.” – ( अथर्व कुलकर्णी , प्रदेश मंत्री, अभाविप )
यांनीही विद्यार्थ्यांच्या बाजूने ठाम भूमिका मांडत सांगितले की,
“परीक्षा शुल्कवाढ संपूर्णपणे अवाजवी आहे. ही वाढ तातडीने रद्द करण्यात यावी, अन्यथा विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी अभाविप रस्त्यावर उतरेल.”
अभाविपने विद्यापीठ प्रशासनाला आवाहन केले आहे की, ओल्या दुष्काळाच्या संकटात विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार वाढवू नये आणि तात्काळ निर्णय परत घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा.
