पुणे महानगरपालिकेच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या दुर्दैवी मृत्यू विरोधात अभाविपचे आंदोलन

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या आंबेडकर वसतिगृहात चाललेल्या निष्काळजीपणा व अस्वच्छतेमुळे दोन विद्यार्थ्यांचा डेंग्यू व कावीळ या आजारामुळे अकाली मृत्यू झाला. प्रशासनाच्या या हलगर्जीपणा विरोधात अभाविपने तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले.

सुमारे पाच दिवसांपूर्वी पुण्यातील घोले रोड, शिवाजीनगर येथे स्थित महानगर पालिकेच्या, आंबेडकर वसतिगृहात वास्तव्यास असणाऱ्या दोन विद्यार्थ्यांच्या अकाली मृत्यु ची बाब उघडकीस आली. हा मृत्यू डेंग्यू व कावीळ या आजारामुळे झाला. या विद्यार्थ्यांना डेंग्यू व कावीळ या आजाराची लागण ही वसतिगृहातच झाली असल्याचे लक्षात आले. संबंधित वसतीगृहात अत्यंत अस्वच्छता त्याचबरोबर सोयी सुविधांचा अभाव असणे याही गोष्टी आढळून आल्या. वसतीगृहात स्वच्छता नसल्याने पाण्यामध्ये डेंग्यूच्या डासांची पैदास होऊन त्याचा संसर्ग संपूर्ण वसतिगृहात पसरला. याचबरोबर पिण्याच्या व वापरण्याच्या पाण्यात असणारी अस्वच्छता हे विद्यार्थ्याला कावीळ होण्यास प्रवृत्त करणारे ठरले.

Advertisement

या संपूर्ण विषयात वसतिगृह प्रशासन हे ढिम्म कारभाराचे उत्तम उदाहरण प्रस्तुत करत आहे. वसतिगृह प्रशासनाच्या निष्काळजी कारभारामुळे विद्यार्थ्यांचा मृत्यू होऊन दोन दिवस उलटून गेल्यानंतरही वसतिगृहात ठिकठिकाणी अस्वच्छता आहे. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे. या घटनेस सर्वस्वी जबाबदार पुणे महानगरपालिका व वसतीगृह प्रशासन आहे.

अभाविपने केलेल्या आंदोलनात पुढील दोन दिवसात वसतिगृह आणि वसतिगृह परिसर यांची स्वच्छता व्हावी त्याचबरोबर संबंधित दोषींवर कारवाई करून निलंबन करावे. व मृत विद्यार्थ्यांच्या परिवारास नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी केली आहे. यावर पुणे महापालिकेचे उपायुक्त नितीन उदास यांना अभाविपच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिले व त्यांनी पुढील तीन दिवसात सर्व मागण्या पूर्ण करू, असे आश्वासन दिले आहे.

यावेळी वसतिगृहात झालेल्या या गंभीर घटनेची तात्काळ चौकशी होऊन मृत विद्यार्थ्यांना प्रशासनाकडून त्वरित न्याय मिळावा असे मत पुणे महानगर मंत्री हर्षवर्धन हरपुडे यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page