देवगिरी महाविद्यालयात लेखाकर्म व वित्तीय क्षेत्रातील संधी याविषयावर कार्यशाळा संपन्न
छत्रपती संभाजीनगर : देवगिरी महाविद्यालयातील वाणिज्य विभाग आणि करियर कॉउंसिलर्स बोर्ड ऑफ आयसीएआय छत्रपती संभाजीनगर चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमानेलेखाकर्म व वित्तीय क्षेत्रातील संधी याविषयावर कार्यशाळा दि २९ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो डॉ अशोक तेजनकर, प्रमुख उपस्थिती म्हणून उपप्राचार्य डॉ विष्णू पाटील आणि प्रमुख व्याख्यात्या सीए समृद्धी लुनावात यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना वाणिज्य विभागातील प्रा डॉ विवेक वायकर यांनी वाणिज्य विभागात शिक्षण पूर्ण करून वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती तसेच विभागातील विद्यार्थ्यांनी सीए, सीएमए, सीएस अशा विविध कोर्सेस मध्ये प्राविण्य मिळविल्याचे सांगितले. वाणिज्य विद्याशाखेतील विद्यार्थ्यांसाठी लेखाकर्म व वित्तीय क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे आहे असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा उपप्राचार्य प्रा डॉ विष्णू पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना असे म्हणाले की वाणिज्य विद्याशाखा विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध करणारी विद्याशाखा आहे. या संधीचा फायदा घेऊन आपल्या उज्वल भविष्याकडे वाटचाल करावी. आपण जर मेहनत केली तर आपला सर्वांगीण विकास होऊन आपण निश्चित पणे यशस्वी व्हाल. विद्यार्थ्यांनी पुढील भविष्याचा विचार करून आयोजित केलेल्या विविध उपक्रमात सक्रिय पणे सहभागी होऊन आपल्या ज्ञानात भर घालावी. आमचे यशस्वी विध्यार्थी हाच आमचा अभिमान आहे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी प्रमुख व्याख्यात्या म्हणून उपस्थित करियर कॉउंसिलर्स बोर्ड ऑफ आय सी ए आय छत्रपती संभाजीनगर चॅप्टरच्या सीए समृद्धी लुनावात असे म्हणाल्या की, वाणिज्य शाखेतील विध्यार्थाना करियर विषयी अनेक संधी उपलब्ध आहेत. यावेळी आपल्या मार्गदर्शनात लुनावत यांनी विद्यार्थ्यांना सीए होण्यासाठी आवश्यक पात्रता, अभ्यासक्रम, उपलब्ध सुविधा तसेच आय सी ए आय तर्फे दिली जाणारी शिष्यवृत्ती या संदर्भात मार्गदर्शन केले. सीए प्रवेश प्रक्रिया सीए फाउंडेशन इंटरमीडिएट व फायनल कोर्स या संदर्भात सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो डॉ अशोक तेजनकर हे होते. आपल्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलतांना प्राचार्य प्रो डॉ अशोक तेजनकर असे म्हणाले की, वाणिज्य विभागातर्फे महाविद्यालयात विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमात उद्योजक, विविध तज्ज्ञ व्यक्तींची करियरविषयी मार्गदर्शपर व्याखाने, कार्यशाळा आयोजित करत असतात. या उपक्रमामुळे विध्यार्थ्यांना योग्य दिशा मिळते व ते आपल्या आवडीच्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाणिज्य विभागातील प्राध्यापक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यशाळेसाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ रवी पाटील, डॉ अपर्णा तावरे व विष्णू पाटील यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा कैलास ठोंबरे यांनी केले. यावेळी वाणिज्य विभागातील 110 विद्यार्थी उपस्थित होते.