शिवाजी विद्यापीठात ‘व्हॉइस कल्चर’ विषयावर कार्यशाळा संपन्न
आवाजाच्या गुणवत्तेसाठी श्वासाचे व्यायाम करा : तुषार भद्रे
कोल्हापूर : आवाज ही आपली ओळख असते. आवाजाच्या गुणवत्तेसाठी श्वासाचे व्यायाम करा, असे आवाहन उच्चारशास्त्र तज्ञ तुषार भद्रे यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीने सोमवारी व्हॉइस कल्चर या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी ते बोलत होते. संजय घोडावत विद्यापीठाचा पत्रकारिता विभाग तसेच महावीर महाविद्यालयाचे विद्यार्थी या कार्यशाळेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भद्रे म्हणाले, बोलणं हे कौशल्य आहे. परंतु ते प्रयत्नपूर्वक अधिक प्रभावी आणि प्रवाही करता येतं. बोलण्याचं गाणं करता आले पाहिजे. हृदयापासून हृदयापर्यंत संवाद साधता आला पाहिजे. बोलण्यासाठी श्वास अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो. श्वास ही स्वरयंत्राची ऊर्जा आहे. यासाठी श्वासाचे व्यायाम करणे गरजेचे असते. यावेळी श्वासाचे व्यायाम कसे करायचे याचे प्रात्यक्षिकही त्यांनी करून दाखविले.
या कार्यशाळेत व्हॉइस डिलिव्हर कसा करायचा, आवाजाची जातकुळी कशी ओळखायची, रियाज कसा करायचा यावर मार्गदर्शन करण्यात आले. आवाजाची जोपासना व आवाजाची भावनांशी जोड देणे याबद्दल त्यांनी तपशीलवार विवेचन केले. सहभागींना एकत्र करून त्यांच्याच आवाजामध्ये भद्रे यांनी सादरीकरण करून दाखवले. प्रारंभी अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी प्रास्ताविक केले. डॉ. प्रसाद ठाकूर यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन नूतन सूर्यवंशी यांनी केले. प्रा. शिरीष शितोळे, प्रा. प्रकाश कांबळे, शिवानी शिवदास, अक्षय जहागीरदार, विजय मगदूम, अश्विनी धुरी आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उपस्थितांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. डॉ. सुमेधा साळुंखे यांनी आभार मानले.
फोटो : पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीने आयोजित व्हाईस कल्चर कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करताना उच्चारशास्त्र तज्ञ तुषार भद्रे. समोर उपस्थित सहभागी विद्यार्थी.