श्री बंकटस्वामी महाविद्यालयात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 या विषयावर कार्यशाळा संपन्न
बीड : श्री बंकटस्वामी महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या (IQAC)वतीने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेसाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विवेक मिरगणे तर प्रमुख उपस्थिती डॉ. शिवाजी मोरे तसेच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख डॉ. प्रकाश कोंका उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विवेक मिरगणे यांनी केले. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये झालेले बदल तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये नवीन बदलाला कसे सामोरे जायचे याविषयी मार्गदर्शन केले.
तसेच नवीन शैक्षणिक धोरण हे जून 2024 पासून आपल्या विद्यापीठांतर्गत सर्व महाविद्यालयांना लागू होणार असल्यामुळे यावर्षी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या शैक्षणिक बदलाविषयी आपण सखोल माहिती देणे. तसेच शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व प्राध्यापकांनी देखील या नवीन शैक्षणिक धोरणातील बदलाला सामोरे जाताना नवीन अभ्यासक्रम कसा असेल त्याविषयी प्रशिक्षण घेणे तसेच इंटरनेटच्या माध्यमातून आपण आपापल्या विषयांमध्ये झालेल्या बदलाचा सखोल असा अभ्यास करावा. नवीन अभ्यासक्रम काही निर्माण करू शकतो का तसेच विद्यार्थ्यांना आपण शिकवलेला अभ्यासक्रम त्यांच्या जीवनात रोजगारासाठी कशा पद्धतीने उपयोगात येईल याचाही आपण अभ्यास केला पाहिजे असे मत त्यांनी प्रसंगी व्यक्त केले.
या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक डॉ प्रकाश कोंका यांनी सविस्तर अशी पीपीटी द्वारे स्लाईडच्या माध्यमातून क्रेडिट बेस् सिस्टीम व विषय निवडीतील स्वातंत्र्य अशा अनेक नवीन शैक्षणिक धोरणातील बदलाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर या कार्यशाळेमध्ये प्राध्यापकांनी देखील आपल्या मनामध्ये असणाऱ्या शंका याविषयी सखोल अशी चर्चा करण्यात आली. विविध प्राध्यापकांनी यावेळी प्रश्न उपस्थित केले या सर्व प्रश्नांचे उत्तरे महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच प्रमुख मार्गदर्शक यांनी दिले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.