अमरावती विद्यापीठात ‘सामाजिक संशोधनामध्ये सांख्यिकीचे महत्व ‘या विषयावर कार्यशाळा संपन्न
विद्यार्थ्यांच्या सर्जनशील विचार निर्मितीसाठी संशोधन कार्याची गरज – प्रा पुष्पक कोंडे
अमरावती : संशोधनकार्य हे विचार,कल्पकता आणि नाविन्यतेचे महत्वाचे माध्यम असल्यामुळे विद्यार्थांच्या क्रियाशीलतेला चालना मिळण्यास मदत होते. विद्यार्थांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनात आपल्यामध्ये असणाया अंतर्भूत सुप्त- कलागुणांचा शोध घेऊन आपल्या अस्तित्वाची ओळख निर्माण करावी, जेणेकरून त्यांना आपली उद्दिष्टे आणि ध्येय साध्य करता येईल. आजच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांच्या विकासाला खरोखर दिशा प्राप्त करून द्यायची असेल, तर त्यांच्या सर्जनशील विचार निर्मितीसाठी संशोधनकार्य करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्रा पुष्पक कोंडे यांनी केले.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागातील एम ए योगशास्त्र, पी जी डिप्लोमा योगा थेरपी, आणि पी जी डिप्लोमा नेचरोपॅथी अँड योगिक सायन्स या पदव्युत्तर पदवी आणि पदविका अभ्यासक्रमाच्यावतीने ‘सामाजिक संशोधनामध्ये सांख्यिकीचे महत्व ‘या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यशाळेच्या पहिल्या सत्राचे अध्यक्ष विभागाचे संचालक डॉ श्रीकांत पाटील होते.
प्रा कोंडे पुढे म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – 2020 प्रमाणे विद्यार्थी केंद्रित संकल्पना राबविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये संशोधन कार्याची सजगता निर्माण व्हावी, यासाठी पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी संशोधन हा विषय अनिवार्य करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये दूरदृष्टी, कल्पकता, नाविन्यपूर्ण विचार आणि संशोधन कार्य करण्याची रुची निर्माण होण्यास मदत होईल. संशोधन कार्यामध्ये व्यापकता निर्माण व्हावी; यासाठी संशोधनामधील अंतर्भूत सर्व घटकांचा अभ्यास महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. संशोधन कार्याचे क्षेत्र हे अधिक व्यापक असेल, तर त्या ठिकाणी संशोधनामध्ये सांख्यिकीय पद्धतीचा अवलंब कसा करावा या विषयीचे सखोल मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी संशोधन विषयामध्ये आपली सृजनशीलता निर्माण करावी, जेणेकरून विविध सामाजिक शैक्षणिक, आर्थिक तसेच राजकीय विषयांवर नव्याने संशोधन कार्य करून नवीन पैलू अभ्यासता येईल, असा विश्वास त्यांनी या प्रसंगी व्यक्त केला.
दुसऱ्या सत्रात संशोधकाची वैचारिक प्रगल्भता वाढविण्यासाठी तो संशोधक मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम असणे महत्वाचे आहे याकरिता योगाभ्यासाद्वारे त्याचे आरोग्य हे सुदृढ व निरोगी कसे ठेवता येईल, याविषयीचे व्यायाम, प्रा आदित्य पुंड यांनी विविध प्रात्यक्षिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून करून घेतले. अध्यक्षीय भाषणात डॉ श्रीकांत पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांच्या आवडी-निवडींना प्रोत्साहन देण्यामध्ये संशोधन कार्याची भूमिका फार महत्त्वाची ठरते. विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनामध्ये आपली कल्पकता व नाविन्यपूर्ण विचार निर्माण करून वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर संशोधन कार्य करण्यासाठी पुढे यावे, जेणेकरून समाजातील वास्तव स्थिती अभ्यासता येईल आणि विद्यार्थ्यांना विकासात्मक दिशा मिळण्यास मदत होईल. कार्यशाळेचा उद्देश डॉ अश्विनी राऊत यांनी प्रस्ताविकेतून स्पष्ट केला. सूत्रसंचालन प्रयोग निस्ताने, तर आभार प्रा स्वप्निल ईखार यांनी मानले. कार्यशाळेला तिन्ही अभ्यासक्रमाचे प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.