शिवाजी विद्यापीठात ‘केस स्टडी व क्षेत्रभेट अभ्यासाद्वारे अनुभवात्मक शिक्षण’ विषयावरील कार्यशाळा संपन्न

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाने महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास अकादमी (MSFDA) आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), मुंबई यांच्या सहकार्याने ‘केस स्टडी व क्षेत्रभेट अभ्यासाद्वारे अनुभवाधारित शिक्षण’ या विषयावरील दोन दिवसीय कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागातील सेमिनार हॉलमध्ये दिनांक ७ ते ८ ऑगस्ट २०२४ दरम्यान ही कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यक्रमाचा उद्देश नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने अध्यापकांच्या अध्यापन कौशल्यांचा विकास करणे, विद्यार्थ्यांना संशोधनात्मक व्यावहारिक ज्ञान मिळवून देणे आणि सिद्धांतिक ज्ञान व व्यावहारिक अनुप्रयोग यांच्यातील अंतर कमी करून सर्वांगीण शिक्षणाचे नवीन युग निर्माण करणे हा होता.

A workshop on 'Experiential learning through case studies and field visits' was held in Shivaji University

कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास अकादमीचे प्रतीक धमाल, गौरव पवार, स्वप्नील आंबुरे, विक्रम पाटील आणि भारतीय तंत्रज्ञान संस्थातील एम एम चिराग, रिज्युता काबंदी, आदिती वाकळकर, प्रथमेश मुरकुटे, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट विभागातील सहायक प्राध्यापिका व कार्यशाळा  समन्वयिका डॉ कविता वड्राळे, डॉ तानाजी घागरे आदि मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

कार्यक्रमाची सुरुवात सहभागींची ओळख करून देणे आणि कार्यशाळेच्या वेळापत्रकाचे विवरण देणे याने झाली. पहिल्या सत्रात स्वप्नील आंबुरे यांनी “शैक्षणिक पद्धतींची विकास आणि केस स्टडी” या विषयावर मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी नवीन अध्यापन पद्धतींच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्यानंतर, प्रतमेश मुरकुटे यांनी “वास्तविकता आणि आसपासच्या वातावरणाचे अवलोकन” या विषयावर एक प्रेरणादायक सत्र घेतले, ज्यामुळे सहभागीना सिद्धांत आणि प्रत्यक्ष अनुभव यांची सांगड घालण्यास प्रोत्साहन मिळाले. दुपारच्या सत्रात आंबुरे यांनी ‘आपले प्रश्न आपले विज्ञान केस स्टडीचे डिझाइन’ या विषयावर मार्गदर्शन केले, ज्यामध्ये उपस्थितांनी व्यावहारिक अनुप्रयोगांसाठी केस स्टडीच्या डिझाइनचा अभ्यास केला.

कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी, कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले तालुक्यातील तळंदगे या गावास विद्यार्थ्यांनी क्षेत्र अभ्यासासाठी भेट दिली. सहभागी विद्यार्थ्यानी गावातील स्थानिक दुग्धालयाला भेट दिली आणि ग्रामीण उद्योगांच्या पद्धतींचे प्रत्यक्ष ज्ञान मिळवले. त्यानंतर, ग्रामपंचायत येथे छोटेखानी ओळख आणि बैठक घेण्यात आली. यावेळी ग्रामपंचायतचे कामकाज, विकासाची कामे, गावाच्या पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा व्यवस्थेचे परीक्षण, गावकऱ्यांशी संवाद साधणे, स्वयंसेवी गट आणि सूक्ष्म- उद्योग अभ्यास या दृष्टीने विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

या कार्यशाळेच्या माध्यमातून सहभागी अध्यापक – शिक्षकांनी परस्परसंवादी सत्रांमध्ये पुढाकार घेऊन वास्तव जगातील समस्या सोडवणे, चिकित्सक विचार आणि नवोन्मेषावर या दृष्टीने भर दिला. या कार्यशाळेने शिक्षकांना प्रभावी क्षेत्र – आधारित केस स्टडी डिझाइन करण्याची साधने दिली, तर विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक उपक्रमांच्या व्यावहारिक अनुप्रयोगाबद्दल अनुभवजन्य ज्ञान दिले. या कार्यशाळेमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या विविध विभागातील व कार्यक्षेत्रातील महाविद्यालयामधून अध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page