कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयात महिला कक्षातर्फे स्त्री-पुरुष समानता कार्यशाळा संपन्न

स्त्री-पुरुष समानता हा संस्कार घरातूनच व्हावा – प्रो. मृणालिनी फडणवीस

उपनिषद्काळातील स्त्री-पुरुष समानतेचा विचार आजही औचित्यपूर्ण – प्रो. हरेराम त्रिपाठी

रामटेक : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या महिला कक्ष, अंतर्गत महिला तकार निवारण कक्ष व शिक्षणशास्त्र विभागातर्फे स्त्री-पुरुष समानता या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा सोमवार, दि. 26 फेब्रुवारी 2024 रोजी रामटेक येथे संपन्न झाली. या कार्यशाळेच्या उद्घाटन समारोहाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी होते. प्रमुख अतिथी व मार्गदर्शिका या नात्याने प्रो. मृणालिनी फडणवीस, मा. पूर्व कुलगुरू, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर उपस्थित होत्या. व्यासपीठावर रामटेक परिसर संचालक प्रो हरेकृष्ण अगस्ती आणि कार्यशाळेच्या संयोजिका डॉ. राजश्री मेश्राम उपस्थित होत्या.

कार्यशाळेचा प्रारंभ दीपप्रज्वलनाने झाला. प्रास्ताविक डॉ. राजश्री मेश्राम यांनी केले. समाजातील स्त्री व पुरुष यांच्यामधील असमानतेची दरी अजूनही पूर्णपणे नष्ट झाली नसून ती कोणत्या प्रकारे किंवा पद्धतीने दूर करता येईल यावर या कार्यशाळेत मंथन होणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रो. हरेकृष्ण अगस्ती यांनी आपल्या प्रभावी भाषणात “स्त्री ही परिवाराचा कणा असून, तिच्याशिवाय घर हे सुने असते. विकसित भारताचे स्वप्न साकार करावयाचे असेल तर आपण स्त्रीला समाजात, कार्यक्षेत्रात योग्य तो सन्मान दिलाच पाहिजे. समान संधी व समान अधिकार या दोन्हींचा जागरुकतापूर्वक वर्तनव्यवहार पुरुषांकडून होणे आवश्यक आहे. आत्मनिर्भर भारताचे लक्ष्य हे सर्व स्तरांवर आत्मनिर्भरतेचे तर आहेच पण स्त्रियांना आत्मनिर्भर बनविण्यास मदत करण्याचे आपले कर्तव्यही यात महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. समाजाचा, परिवाराच आधारस्तंभ व कणा असलेल्या स्त्रीशक्तीला मी अभिवादन करतो.’

Advertisement

प्रो. मृणालिनी फडणवीस यांनी समाजातील विविध उदाहरणे आणि प्रत्यक्ष स्थितीचा लेखाजोखा सांख्यिकीय आकडेवारी आणि घडलेल्या घटनांद्वारे उपस्थितांसमोर प्रत्ययकारी रीतीने मांडला. आज संयुक्त राष्ट्रसंघात जे काही महत्त्वाचे मुद्दे विचारात घेतले आहेत त्यामध्ये स्त्रियांसाठी समानता हा मुद्दा पाचव्या कमांकावर आहे. शिक्षण व आरोग्य या दोन्हींबाबतीत सर्वप्रथम ही समानता अमलात आली पाहिजे. भारतात ब-याच प्रमाणात यासंदर्भात बदल होत असला तरी तो पुरेसा नाही. केंद्रसरकारच्या ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेमुळे हरयाणायतील स्त्रीभ्रूणहत्या ब-याच प्रमाणात कमी झाली असून त्यांचे स्त्री-पुरुष प्रमाण ही सुधारले आहे. भारतातील विविध राज्यांमध्ये या योजनेमुळे हे प्रमाण सुधारण्यास मदत झाली आहे. स्त्री ही अत्यंत कर्तबगार तर आहेच पण जीवनाच्या विविध आघाडयांवर शारीरिक व मानसिक कणखरतेने ती कार्य करू शकते. फान्स व जर्मनी या देशांमध्ये अनुकमे 70 व 60 टक्के महिला मंत्रिमंडळात सामील आहेत. समाजातील स्त्री-पुरुष समानता रुजविण्यासाठी घरातूनच मुलांवर संस्कार झाले पाहिजे. समाजाच्या विचारात व मानसिकतेत बदल होणे आवश्यक असून तो बदलल्याशिवाय स्त्री-पुरुष समानता साधल्या जावू शकत नाही.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी म्हणाले, विश्वविद्यालयाच्या विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांना या गुरुकुलात निवास करताना, येथे शिकताना या समानतेचा अनुभव येतो. कुठलाही भेदभाव न करता सर्व गोष्टीत, अध्ययन, स्पर्धा, कार्ये, गुरुकुलातील एकत्रित कार्यकम यांच्याद्वारे हा समानतेचा संस्कार येथील विद्यार्थ्यांवर होतो ही मला समाधानाची गोष्ट वाटते. सांख्यांनी पुरुष व प्रकृतिद्वारे सृष्टीनिर्मिती मांडली आहे. पुरुष हा अकर्ता मानला असून, प्रकृति ही कर्तारूपात सृष्टी सर्जन करणा-या रूपात विशद केली आहे. परिवारात सुद्धा मातृशक्तीचे मत विचारात घेतल्याशिवाय निर्णय घेता येत नाही. ही समानता घरातूनच आली तर भेदभावाची भावना आपोआपच संपुष्टात येईल. स्त्री व पुरुषाचे सायुज्य हे महाकवी कालिदासाने वर्णिले आहेच, विविध स्तोत्रांद्वारे शक्तिरूपिणी असलेल्या स्त्रीचा सन्मान केला आहे. स्त्रीला समान संधी आणि तिची काळजी करणे हे आपल्या सर्वाचेच कर्तव्य आहे. याज्ञवल्क्य व मैत्रेयी या संवादाद्वारे उपनिषद्द्वारांनीही स्त्रियांना केवळ गृहकार्यच नाही तर ब्रह्मवादिनी होण्याचा, आत्मानुभव घेण्याचा अधिकार होता हे दाखवून दिले आहे. पाच हजार वर्षापूर्वीचे हे स्त्रीस्वातंत्र्य गेल्या 500 वर्षापासून समाजाने स्वार्थापोटी बेडीत अडकवले आहे. उपनिषद्काळातील स्त्री-पुरुष समानता पुनश्च एकदा अनुभव घ्यायचा असेल तर कुटुंबातूनच तो संस्कार झाला पाहिजे असे कुलगुरूंनी आपल्या भाषणात सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन प्रा. माधवी पाटील यांनी केले तर आभार कल्याणी देशकर यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह प्राध्यापक, विभागप्रमुख यांची भरगच्च उपस्थिती होती. वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page