अमरावती विद्यापीठातील समाजशास्त्र विभागात लघु उद्योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रम संपन्न
लघु उद्योगासाठी निर्णयक्षमता व इच्छाशक्तीची गरज – काळबांडे
अमरावती : लघु उद्योग उभारण्यासाठी फार मोठे भांडवल, मनुष्यबळ किंवा उच्च शिक्षणाची गरज नाही, तर त्यासाठी निर्णयक्षमता आणि इच्छाशक्तीची गरज असल्याचे मत व्ही के कंट्रोल सिस्टिम प्रा लि कंपनीचे संचालक विकी काळबांडे यांनी व्यक्त केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाच्यावतीने लघु उद्योग दिवसानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी प्रस्तूत विचार व्यक्त केले. अध्यक्षस्थानी विभागप्रमुख डॉ के बी नायक, प्रमुख अतिथी म्हणून डॉ के यु राऊत उपस्थित होते.
याप्रसंगी विभागातील विद्यार्थी सुमित पवार, संदीप महल्ले, गायत्री खरबडे, राजकुमार सरयाम, रमेश पवार, निर्मला काळबांडे यांनीही लघु उद्योगाबाबत सामाजिक आणि शैक्षणिक स्थिती आपल्या मनोगतातून मांडली.
अध्यक्षीय भाषणातून डॉ के बी नायक म्हणाले, विकी काळबांडे यांनी शून्यातून आपले विश्व निर्माण केले आहे. आज त्यांच्या कंपनीचे अमरावतीच नाही, तर जगभरात ग्राहक आहेत. लघु उद्योगासाठी मित्र परिवार, नातेवाईक यांचेही योगदान आवश्यक आहे. तरीही परिश्रम आणि चिरंतन काम करण्याची इच्छाशक्ती, कर्तव्यनिष्ठा, सहकार्य हे देखील यशस्वी उद्योजकाचे घटक आहेत. जनसंपर्क आणि व्यवहारिक ज्ञानाच्या आधारावर सुद्धा लघु उद्योग उभारता येऊ शकतो, ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावी आणि स्वयंरोजगार निर्माण करावा असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साधना इंगोले यांनी, तर आभार सुनिता इंगळे यांनी मानले. कार्यक्रमाला विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ रोहिणी वावरे, सुनिता इंगळे, साधना इंगोले, रमेश पवार, राजकुमार सरयाम, उपेंद्र मिश्रा यांनी परिश्रम घेतले.