सरस्वती भुवन महाविद्यालयात गोविंदभाई श्रॉफ यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम संपन्न

गोविंदभाई श्रॉफ –  पायाभूत प्रश्नांची जाण असलेला नेता – डॉ शिवशंकर मिश्रा

छत्रपती संभाजीनगर : पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांना पायाभूत, मूलभूत प्रश्नांची उत्तम जाण होती. चांगल्या शिक्षकांचा शोध घेऊन त्यांनी शिक्षकांना सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत सामावून घेतले. मराठवाड्यातील विविध शैक्षणिक प्रश्नांविषयी ते विलक्षण संवेदनशील होते, त्यासाठी शासन दरबारी त्यांनी संघर्ष केला. असे प्रतिपादन सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयातील माजी प्राचार्य डॉ शिवशंकर मिश्रा यांनी केला.

सरस्वती भुवन शिक्षण संस्था आयोजित गोविंदभाई श्रॉफ यांच्या जयंतीनिमित्त ‘आठव गोविंदभाईंचा’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

गोविंदभाई यांच्या आठवणींनी मनात काहूर निर्माण होते. वर्ध्याहून मला इथे आणण्यात भाईंचाच मोठा वाटा आहे, असे सांगत त्यांनी गोविंदभाई यांच्या स्वभावाची आणि कार्यपद्धतीची अनेक वैशिष्ट्ये विशद केली.

गोविंदभाई विद्यार्थ्यांशी संवाद साधून शिकवण्याचा आढावा घ्यायचे. संस्थेला समाजाभिमुख करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे. विद्यार्थी आंदोलन, पाणी प्रश्न, शिक्षकांचा प्रश्न, शिक्षक श्रेणी निर्धारण, इत्यादी महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात भाईंचा महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे. संस्थेसाठी निधी संकलन करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ७२ च्या दुष्काळाने घरंदाज लोक खडी काम करताना दिसले. त्यावेळी नियोजनात भाईंनी लक्ष घातले. त्यांनी रचनात्मक गोष्टी हाती ठेवून त्यावर चर्चा घडवून आणली, त्यादरम्यान विद्यापीठ कायदा आला. भाईंनी प्राध्यापक यांना अधिकार द्या पण संचालकांनाही ध्यानी घ्या, असा आग्रह त्यांनी धरला. त्यांनी कुणाशी कटूता ठेवली नाही. संस्थांना अधिक ग्रँट कसा मिळेल याचा विचार केला.

Advertisement

उदगीरला जाताना रस्त्यावरील साध्या टपरीवर चहा, अल्पोपाहार केला. तेथे जमलेल्या लोकांशी विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. वर्ध्याला बजाज कुटुंबाने संमेलन घेतले. त्यावेळी रामकृष्ण बजाज यांना घटत्या कामगारांची संख्येवर प्रश्न विचारला. त्यावेळी आश्वासनांवर लोकांच्या आशेचे काय असा प्रश्न विचारला. पाणी, जमीन, शिक्षण, रोजगार याविषयी ते कमालीचे सजग होते. त्याची माजी अध्यक्ष दिनकर बोरीकरांनी मला बोलावले आणि प्राचार्य पदाविषयी भाईंशी बोलायला सांगितले.

 पुढे मला एक्सटेंशन मिळाले तेव्हा भाईंनी मला एक लाख पगार असताना मी फक्त १ रुपया पगारावर काम करतो, असे सांगितल्यावर त्यांना आश्चर्य वाटले. त्यांच्या जाण्याने माझ्या आयुष्यातील सुवर्णपर्व संपले असे ते शेवटी ते म्हणाले.

अध्यक्षीय समारोपात संस्थेचे अध्यक्ष ऍड दिनेश वकील म्हणाले की, भाईंसोबत काम करताना ते इतरांना जिंकून घ्यायचे, असे सांगून त्यांनी डॉ यार्दी यांना मुंबईहून प्राचार्य म्हणून आणल्यासह अनेक आठवणींना उजाळा दिला. त्यांच्यातील गुणग्राहकता उच्च प्रतीची होती. भाईंचे स्मरण म्हणून सर्वानी संस्थेसाठी आपले चांगली सेवा द्यावी, असे ते म्हणाले.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ बी वाय क्षीरसागर, सहचिटणीस डॉ रश्मी बोरीकर, कोषाध्यक्ष मिलिंद रानडे, संस्था सदस्य  ज्ञानप्रकाश मोदाणी, दीपक पांडे, डॉ विजया मिश्रा, प्रा श्रीराम जाधव, यांच्यासह प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी यांची उपस्थिती होती. हा कार्यक्रम गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमी सभागृहात संपन्न झाला.

 सूत्रसंचालन डॉ संदीप चौधरी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page