‘लोकसंत गाडगे बाबा व जगद्गुरू तुकोबाराय: एक चिंतन’ विषयावर विद्यापीठात 15 ऑक्टोबर रोजी चर्चासत्राचे आयोजन
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील संत गाडगे बाबा अध्यासन केंद्र व जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:00 वा विद्यापीठ परिसरातील डॉ श्रीकांत जिचकार स्मृती संशोधन केंद्राच्या सभागृहात ‘लोकसंत गाडगे बाबा व जगद्गुरू तुकोबाराय : एक चिंतन’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे राज्यध्यक्ष शिवश्री डॉ सतिश तराळ हे यावेळी बीजभाषण करणार आहेत.
चर्चासत्राचे उद्घाटन रिध्दपूर मराठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ अविनाश आवलगावकर यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थान कुलगुरू डॉ मिलींद बारहाते भूषविणार आहेत. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून रिध्दपूर मराठी विद्यापीठाचे कुलसचिव तथा उच्च शिक्षण सहसंचालक डॉ केशव तुपे, जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थान, देहूचे अध्यक्ष व संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज हभप पुरुषोत्तम दत्तात्रय मोरे, विश्वस्त आणि संत तुकाराम महाराज यांचे वंशज हभप माणिकमहाराज मोरे, मराठा सेवा संघाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष शिवश्री अरविंद गावंडे यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे.
उद्घाटनानंतर दुपारी 1:15 ते 3:15 दरम्यान होणाऱ्या दुसऱ्या सत्रात परिसंवाद होईल. अध्यक्षस्थान जनसारस्वत व जनसाहित्याचे प्रवर्तक डॉ सुभाष सावरकर भूषवतील. यावेळी डॉ संजीव कोंडेकर, नागपूर, डॉ श्रीकांत पाटील, कोल्हापूर, डॉ राजेश मिरगे, अमरावती, डॉ शिवाजी हुसे, छत्रपती संभाजीनगर, डॉ अलका गायकवाड, अमरावती यांचा सहभाग राहील. तिसऱ्या सत्रात होणाऱ्या परिसंवादाचे अध्यक्षस्थान संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ काशिनाथ बऱ्हाटे हे भूषवतील. यावेळी डॉ माधव पुटवाड, अमरावती, डॉ भारती खापेकर, नागपूर, डॉ मंदा नांदुरकर, अमरावती, डॉ हेमराज निखाडे, जगद्गुरू तुकोबाराय अध्यासन प्रमुख, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, प्रा संदीप तडस, अमरावती यांचा सहभाग राहील.
समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे, प्रमुख अतिथी म्हणून व्यप सदस्य डॉ भैय्यासाहेब मेटकर, कुलसचिव डॉ अविनाश असनारे, प्रसिध्द लेखक व समीक्षक डॉ मनोज तायडे यांची उपस्थिती राहणार आहे. या चर्चासत्राचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संत गाडगे बाबा अध्यासन केंद्रप्रमुख डॉ दिलीप काळे यांनी केले आहे.