एमजीएम विद्यापीठात ‘इमोशनल मॅनेजमेंट फॉर वर्किंग वुमन’ या विषयावर परिसंवाद संपन्न
इतर महिलांसह आपण स्वत:ला स्वीकारणे आवश्यक; एमजीएममधील परिसंवादात मान्यवरांचा सूर
छत्रपती संभाजीनगर : एमजीएम मदर तेरेसा कॉलेज ऑफ नर्सिंग, इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन व सक्षमा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इमोशनल मॅनेजमेंट फॉर वर्किंग वुमन’ या विषयावर एमजीएम विद्यापीठाच्या आर्यभट्ट सभागृहात आज दुपारी १२:३० वाजता परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात मानसोपचारतज्ञ डॉ. मधुरा अन्वीकर व मोटिवेशनल स्पीकर रुचिरा दर्डा या सहभागी झाल्या होत्या. यावेळी डॉ. अपर्णा कक्कड, डॉ. सारिका गाडेकर, डॉ. रेखा शेळके, प्रेरणा दळवी, विविध विभागात कार्यरत असणाऱ्या प्राध्यापिका व सर्व संबंधित उपस्थित होते.
यावेळी बोलताना रुचिरा दर्डा म्हणाल्या, आपण कोणतेही क्षेत्रात कार्यरत असलो तरी आपण आपली एक मानसिकता तयार करत असतो. विशेषत: आपले नशीब आपल्या हातात असून त्याची निर्मिती आपण स्वत: करीत असतोत. जागतिक महिला दिन हा काही एक दिवसासाठी साजरा करण्याची बाब नसून महिलांनी आपले स्वातंत्र्य जपत कायम नेतृत्व करीत राहिले पाहिजे. आमची संस्था अत्यंत काळजी घेणारी संस्था असून इथे कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही.
कधी थांबायचे आहे, कोठे थांबायचे आहे आणि का थांबायचे आहे, या प्रश्नांची उत्तरे मिळाली की आपल्याला काम आणि वैयक्तिक जीवनात संतुलित साधने शक्य होते. आपण काय पाहतो हा दृष्टिकोन असतो आणि आपण काय ऐकतो यावरून आपले मत तयार होत असते. त्यामुळे दुसऱ्यांच्या मतांवरून आपण स्वत:चे मूल्यमापन केले नाही पाहिजे. जे आपल्याला दिसते तेच म्हणजे केवळ सत्य नसून इथे प्रत्येकाचे सत्य वेगळे असते. एक महिला म्हणून समकालीन काळामध्ये जगत असताना एकमेकांचे मूल्यमापन करण्यापेक्षा इतर महिलांसह स्वत:ला स्वीकारले पाहिजे, असे प्रतिपादन मानसोपचारतज्ञ डॉ. मधुरा अन्वीकर यांनी यावेळी केले.
काम करणाऱ्या महिलांना येणाऱ्या समस्यांवर आणि यामधून निर्माण होणाऱ्या ताणतणावरती या परिसंवादात सविस्तरपणे चर्चा करण्यात आली. यावेळी परिसंवादात सहभागी झालेल्या महिलांनी आपल्या भावना व्यक्त करीत प्रश्नोत्तराच्या सत्रात सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्लिनिकल इन्स्ट्रक्टर अंजली धिवर यांनी केले. परिसंवादाचे संचालन डॉ. अमरजा देशमुख यांनी केले तर आभार क्लिनिकल इन्स्ट्रक्टर पारूल विश्वकर्मा यांनी मानले.