राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सेवानिवृत्तीनिमित्त कर्तव्यपूर्ती सोहळा संपन्न

विद्यापीठ विकासासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे – डॉ सुभाष कोंडावार

नागपूर : सेवा ही निरंतर सुरू असते त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाच्या विकासासाठी सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी प्र-कुलगुरू डॉ सुभाष कोंडावार यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात दिलेल्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झालेले शिक्षक, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ गुरुवार, दि. ३१ जुलै २०२५ रोजी पार पडला. या कार्यक्रमात डॉ. कोंडावार हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यकारी प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार होते तर, प्रमुख अतिथी म्हणून वित्त व लेखा अधिकारी हरीश पालीवाल, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. मेघा कानेटकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या कार्यक्रमात प्रमुख अतिथींच्या हस्ते विद्यापीठाच्या व्यवसाय प्रबंधन विभागातून सेवानिवृत्त झालेले प्राध्यापक डॉ. अनंत मधुकरराव देशमुख, औषधी निर्माणशास्त्र विभागातून सेवानिवृत्त झालेले प्राध्यापक डॉ. प्रमोद भुजंगराव खेडेकर, सामान्य परीक्षा व चौकशी विभागातून सेवानिवृत्त झालेले उच्चश्रेणी लिपिक शकील अहमद शमसुल हक, उच्च श्रेणी लिपिक रवींद्र कवडूजी चिमोटे, ज्ञानस्त्रोत केंद्रातील ग्रंथालय परिचर प्रभाकर विठ्ठलराव धरमारी, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागातील शेख निसार शेख मुस्तफा यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देऊन विद्यापीठाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

विद्यापीठाला विकासाकडे नेताना सेवानिवृत्त शिक्षक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले संपूर्ण आयुष्य दिले असल्याचे पुढे बोलताना प्र-कुलगुरू डॉ. कोंडावार यांनी सांगितले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कौशल्ययुक्त, रोजगारक्षम तसेच रोजगार निर्माता म्हणून निर्माण करावयाचे असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठातील विविध प्रश्नांवर त्यांनी भाष्य करीत आपण सर्वांच्या सहकार्याने त्याची सोडवणूक करणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मनोगत व्यक्त करताना वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. मेघा कानेटकर यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या अनेक कडू-गोड आठवणी येथे जुळल्या असल्याचे सांगितले. सेवेत असताना राहून गेलेल्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्याची संधी सेवानिवृत्तीनंतर असल्याचे सांगितले.

मनोगत व्यक्त करताना डॉ. अनंत देशमुख यांनी विद्यापीठाचे प्रशासन सर्वांना सोबत घेऊन चालणारे असल्याचे सांगितले. सेवानिवृत्तीचा टप्पा आयुष्यात ठरलेलाच असतो, त्यामुळे सेवेदरम्यान आपण उत्कृष्टपणे विद्यार्थ्यांना सेवा देण्याचा प्रयत्न करावा, असे देखील डॉ. देशमुख म्हणाले. मनोगत व्यक्त करताना डॉ. प्रमोद खेडेकर यांनी त्यांच्या विभाग प्रमुख पदाच्या कार्यकाळात औषधी निर्माणशास्त्र विभागाला विद्यापीठात एनआयआरएफ रँकिंगमध्ये प्रथम क्रमांकावर आणल्याचे सांगितले. विद्यापीठाने पायाभूत सुविधा आणि संशोधनासाठी दिलेल्या निधीचा योग्य प्रमाणे वापर करीत संस्थेचा विभागाचा शैक्षणिक दर्जा कशाप्रकारे उंचावता येतो, याची माहिती त्यांनी दिली.

प्रभाकर धरमारी यांनी देखील यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन महाविद्यालयीन शाखेतील उच्च श्रेणी लिपिक अश्विनी काळे यांनी केले तर आभार वित्त व लेखा अधिकारी हरीश पालीवाल यांनी मांडले. कार्यक्रमाला विविध प्राधिकारणींचे सदस्य, विद्याशाखांचे अधिष्ठाता, विभाग प्रमुख, अधिकारी कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com