सोलापूर विद्यापीठाच्यावतीने अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त ढोल-ताशांच्या गजरात दिमाखात निघाली शोभायात्रा
अहिल्यादेवी होळकर, मल्हारी मार्तंड, म्हाळसा, बानू यांची जिवंत देखावे ठरले लक्षवेधी
सोलापूर विद्यापीठाकडून अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आयोजन
सोलापूर : ढोल-ताशांच्या गजरात, कैताळाच्या निनादात आणि पिवळ्या फेट्यांच्या साक्षीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून काढण्यात आलेली शोभायात्रा म्हणजे अहिल्यादेवींच्या कार्याला आणि विचारांना केलेला एक मानाचा मुजराच होता! या शोभायात्रेत अहिल्यादेवी होळकर, मल्हारी मार्तंड, म्हाळसा आणि बानू यांच्या रूपातील सादर करण्यात आलेले जिवंत देखावे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.













पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्यावतीने अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त शुक्रवारी नॉर्थ कोट मैदान ते अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यापर्यंत अत्यंत भव्य आणि दिमाखदार शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. या शोभायात्रेत कुलगुरू प्रा डॉ प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू प्रा डॉ लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ अतुल लकडे, उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ उमेश काकडे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ केदारनाथ काळवणे, अध्यासन केंद्राचे संचालक प्रभाकर कोळेकर, वित्त व लेखाधिकारी महादेव खराडे, परीक्षा विभागाचे संचालक श्रीकांत अंधारे यांच्यासह शिक्षक, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असलेल्या ढोल-ताशा आणि कैताळाच्या गजराशिवाय कोणताही उत्सव पूर्ण होऊ शकत नाही. शोभायात्रेची सुरुवात याच पारंपरिक वाद्यांच्या निनादाने झाली. विविध ढोल-ताशा पथकांनी आपल्या कौशल्याने आणि तालाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. अहिल्यादेवींच्या रूपातील कलाकाराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. साधी पण तेजस्वी वेशभूषा, कपाळावर कुंकू, गळ्यात मंगळसूत्र आणि हातात शिवपिंड धारण केलेली ती मूर्ती म्हणजे प्रत्यक्ष अहिल्यादेवीच भासत होत्या. त्यांच्या चेहर्यावरील सात्विक भाव, करारी नजर आणि आत्मविश्वासपूर्ण देहबोलीतून अहिल्यादेवींचे व्यक्तिमत्त्व साकार झाले होते.
महाराष्ट्राचे लोकदैवत असलेल्या खंडोबा म्हणजेच मल्हारी मार्तंड आणि त्यांच्या पत्नी म्हाळसा व बानू यांचे देखावेही अत्यंत प्रभावी होते. मल्हारी मार्तंडांच्या रूपातील कलाकाराने हातात खड्ग, भंडारा आणि घोड्यावर स्वार होऊन पराक्रमाचे दर्शन घडवले. म्हाळसा आणि बानू यांच्या रूपातील कलाकारांनी पारंपरिक वेशभूषा आणि अलंकारांनी सर्वांना मोहित केले. अहिल्यादेवी स्वतः शिवभक्त आणि खंडोबाच्या निस्सीम उपासक होत्या. त्यांनी जेजुरीच्या खंडोबा मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. त्यामुळे या देखाव्यांच्या माध्यमातून अहिल्यादेवींच्या श्रद्धेचा आणि त्यांच्या धार्मिक कार्याचा पैलू उलगडत होता.
या शोभायात्रेत सहभागी झालेल्या बहुसंख्य महिलांनी डोक्यावर पिवळे फेटे परिधान केले होते. पिवळे फेटे परिधान करून सहभागी झालेले विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी अहिल्यादेवींच्या प्रति आपली निष्ठा आणि आदर व्यक्त करत होते. हजारो पिवळ्या फेट्यांनी शोभायात्रेला एक आगळीवेगळी ओळख आणि भव्यता प्राप्त करून दिली होती. कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुनील थोरात, उपाध्यक्ष कांचन आघाव यांच्या समितीने या शोभायात्रेचे नियोजन केले होते.