गोंडवाना विद्यापीठात एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न
महाविद्यालयांनी शिक्षण सर्वेक्षणाची माहिती अचूक भरावी – प्र-कुलगुरु डॉ श्रीराम कावळे
अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण कार्यक्रमातंर्गत एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ व संलग्नीत असलेली महाविद्यालये, शैक्षणिक संस्थानात असणाऱ्या सोयी-सुविधा, विद्यार्थी संख्या, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची प्रवर्गनिहाय संख्या, उत्तीर्ण-अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या, महाविद्यालयाची आर्थिक स्थिती, स्कॉलरशिप, नॅक तसेच ईतर सांख्यिकी माहिती या सर्वेक्षणामार्फत शैक्षणिक संस्थाकडून दरवर्षी ऑनलाईन मागविल्या जाते. हि माहिती शैक्षणिक, एनईपी, नॅक तसेच दर्जेदार शिक्षणाच्या दृष्टीने महत्वाची असल्याने महाविद्यालयांनी शिक्षण सर्वेक्षणाची माहिती अचुक भरावी, असे आवाहन विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ श्रीराम कावळे यांनी केले.
अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण कार्यक्रमातंर्गत एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यशाळेला परीक्षा व मुल्यमापन विभागाचे संचालक दिनेश नरोटे, असिस्टंट प्रोग्रामर तथा अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण कार्यक्रमाचे नोडल अधिकारी प्रमोद बोरकर तसेच विद्यापीठाशी संलग्नीत सर्व महाविद्यालयातील नोडल अधिकारी उपस्थित होते.
मार्गदर्शन करतांना प्र-कुलगुरु डॉ कावळे म्हणाले, विद्यापीठ स्थापनेपासूनच विद्यापीठाशी संलग्नीत महाविद्यालयांची शैक्षणिक माहिती संकलित करुन केंद्र व राज्य शासनाला पाठविली जाते. हि माहिती विहीत वेळेत व अचुक जावी, त्याबाबतचे ज्ञान मिळावे यासाठी शासनाने वर्षातून दोनदा कार्यशाळेचे आयोजन करण्याचे सुचविले आहे. अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षणाबाबत विशेष म्हणजे, विद्यापीठाशी संलग्नीत महाविद्यालयातून प्राप्त झालेली माहिती राज्य शासनास सर्वात प्रथम सादर करणारे विद्यापीठ म्हणून गोंडवाना विद्यापीठास उच्च शिक्षण विभागाच्या संचालकाने प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले, हि विद्यापीठासाठी अभिमानाची बाब असल्याचे ते म्हणाले.
त्यासोबतच, महाविद्यालयाची इत्यंभुत माहिती कशाप्रकारे भरुन पाठवावी हे सर्वांनी या कार्यशाळेच्या माध्यमातून समजून घ्यावी असेही डॉ. कावळे म्हणाले.
अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण कार्यक्रमाचे नोडल अधिकारी प्रमोद बोरीकर म्हणाले, अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण (AISHE) हा उपक्रम भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने सन 2011-12 पासून सुरु केला आहे. या उपक्रमात देशभरातील संपुर्ण विद्यापीठे, विद्यापीठाशी संलग्नीत असलेली महाविद्यालयाची माहीती सर्वेक्षणामार्फत ऑनलाईन मागविल्या जाते.
सदर माहीती https://aishe.gov.in/aishe/home या लिंकद्वारे संकलीत करुन देशातील उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारणे, शिक्षणासाठी पायाभुत सुविधा तयार करणे आदी कामांसाठी केला जातो. केंद्रशासन आपले शैक्षणिक धोरण आखतांना सदर माहिती उपयोगात आणत असल्याने सर्व महाविद्यालयांना माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. AISHE ची माहिती भरताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी विद्यापीठात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे बोरकर म्हणाले.