शिवाजी विद्यापीठात हरिशंकर परसाई यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न
हरिशंकर परसाईंचे व्यंग साहित्य कालातील : माहेश्वरी
कोल्हापूर : हिंदीचे प्रसिद्ध लेखक हरिशंकर परसाई यांनी तत्कालीन सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीवर केलेली व्यंग्यात्मक फटकेबाजी ही कालातीत असून त्यांचे समग्र साहित्य हे समाज सुधारणेसाठी महत्त्वपूर्ण असल्याचे मत प्रसिद्ध व्यंग समीक्षक डॉ सुरेश माहेश्वरी (अमळनेर) यांनी व्यक्त केले. हरिशंकर परसाई यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिवाजी विद्यापीठातील हिंदी विभागाच्यावतीने वि. स. खांडेकर भाषा भवन येथे मंगळवारी एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न झाले. यावेळी ते विषयतज्ज्ञ म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्र. कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील उपस्थित होते. त्यांनी हिंदी भाषेतून देश-विदेशांमधील रोजगाराच्या अनेक संधींविषयी माहिती दिली. यावेळी प्रास्ताविकात डॉ. ए. एम. सरवदे यांनी हिंदी व इंग्रजी व्यंग साहित्याला असणा-या व्यापक परंपरेवर प्रकाश टाकला.
प्रथम सत्रात विषयतज्ज्ञ वृषाली मांद्रेकर (गोवा) यांनी व्यंग्य साहित्याची व्याप्ती स्पष्ट केली. अध्यक्ष डॉ. सुनील बनसोडे (जयसिंगपूर) यांनी परसाई यांचे साहित्य व्यक्ती व समाजाला दिशा देणारे असल्याचे सांगितले. द्वितीय सत्रात विषय तज्ज्ञ डॉ. अरूण गंभीरे (उस्मानाबाद) यांनी व्यंग् हा मनोरंजनाचे साधन नसून ते समाजातील कुप्रवृत्तींच्या विरोधात लढणारे शस्त्र असल्याचे मत व्यक्त केले. अध्यक्ष डॉ. साताप्पा सावंत (सांगली) यांनी परसाईंनी नैतिक आदर्शाच्या जोरावर समाजाला योग्य दिशा दाखविणारे साहित्य निर्माण केल्याचे सांगितले. तृतीय सत्रात अनेक विद्वानांनी शोधपत्रांचे वाचन केले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. एकनाथ पाटील (राधानगरी) होते. समापन सत्रात प्रमुख पाहुणे डॉ. अर्जुन चव्हाण म्हणाले की, परसाईंना त्यांच्या व्यंग्यात्मक लेखनामुळे मारहाणही झाली. पण ते मागे हटले नाहीत. त्यांच्या लेखनाने सामान्य हिंदी वाचकांची संख्या वाढविली. यावेळी मध्यप्रदेशसह अनेक संशोधकांनी चर्चासत्राविषयी आपले मत व्यक्त केले.
सूत्रसंचालन डॉ. सुषमा चौगले, डॉ. प्रकाश मुंज यांनी केले. पाहुण्यांची ओळख डॉ. चंदा सोनकर, प्रा. प्रकाश निकम, डॉ. अक्षय भोसले यांनी करून दिली. आभार डॉ. विजय सदामते, डॉ. गीता दोडमणी, डॉ. सुवर्णा गावडे, डॉ. भाग्यश्री पुजारी यांनी व्यक्त केले. यावेळी देशाभरातून शंभरहून अधिक प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी उपस्थित होते.