अमरावती विद्यापीठातील इन्क्युबेशन सेंटरला 5 कोटी रुपयाचे अनुदान मंजूर
कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या मार्गदर्शनाखाली फलश्रृती
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील इन्क्युबेशन सेंटरला शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाकडून 5 कोटी रुपयाचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या निधीमधून नवनवीन संकल्पनांना बळ देणे, नवोपक्रम राबविणे, स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन, आर्थिक मदत, औद्योगिकीकरण आणि मार्केटिंगसाठी मदत, विद्यार्थ्यांमधील प्रतिभा उंचावण्यासाठी त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, प्रयोगशाळा, तंत्रज्ञ, विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे उत्पादनामध्ये रूपांतर करण्यासाठी मदत तसेच शासनाच्या विविध योजना राबविणे अशी विविध प्रकारची विकासात्मक कामे या निधीमधून करण्यात येणार आहे. त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, लॅब डेव्हलपमेंट, विविध प्रकारचे सपोर्ट, सीड फंडिंग, प्रॉडक्ट डेव्हलपमेंटसाठी निधीची मोठी मदत होणार आहे.
विद्यार्थ्यांमधील नवनवीन संकल्पनांना बळ देऊन त्यांना उद्योजक तयार करणे हे या सेंटरचे उद्दिष्ट आहे. निधी प्राप्त करण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सेंटरच्या संचालक डॉ. स्वाती शेरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद यादव, व्यवस्थापक अमोल हिरुळकर, अंकित ठाकूर, सुभाष आदेवार, श्री. नरेश मोवळे, रवी ढेंगळे यांनी यासाठी प्रयत्न केले. निधी प्राप्त झाल्यामुळे विद्यापीठातील नवउद्योजक विद्यार्थ्यांच्या पंखांना अधिक बळ मिळणार आहे.