राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात कर्तव्यपूर्ती सोहळा
सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचाऱ्यांचा सन्मान; विद्यापीठ कुटुंबाप्रमाणे – डॉ. राजश्री वैष्णव
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शिक्षक, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त कर्तव्यपूर्ती सोहळ्याचे आयोजन मंगळवार, दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आले. जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात आयोजित या कार्यक्रमात नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना भावनिक निरोप देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून कुलसचिव डॉ. राजू हिवसे आणि आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. राजश्री वैष्णव यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रमुख अतिथींच्या हस्ते सेवानिवृत्त कर्मचारी श्री. चंद्रशेखर दिगांबर शेळके, श्री. राजेंद्र बाबुराव बालपांडे, श्री. अनिल जनार्दन बडनखे, श्री. राजेश गजाननराव खानोरकर आणि श्री. रमेश उदाराम मेहर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्कारमूर्ती श्री. चंद्रशेखर शेळके, श्री. रमेश मेहर आणि श्री. राजेश खानोरकर यांनी आपले मनोगत व्यक्त करत विद्यापीठातील कार्यकाळातील अनुभवांना उजाळा दिला.

अध्यक्षीय भाषणात डॉ. राजश्री वैष्णव म्हणाल्या की, विद्यापीठ हे केवळ संस्था नसून एक कुटुंब आहे. कर्मचारी सेवानिवृत्त झाले तरी ते या कुटुंबापासून कधीही दूर होत नाहीत. आरोग्याची काळजी घेत कुटुंबासोबत आनंदी व समाधानकारक आयुष्य व्यतीत करावे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दीपक घोडमारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी मानले.
या कर्तव्यपूर्ती सोहळ्यास वित्त व लेखा अधिकारी श्री. हरीश पालीवाल, सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता, विविध शैक्षणिक विभागांचे प्रमुख, शिक्षक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
