एमजीएम विद्यापीठात ‘बाईमाणूस’च्या वर्धापनदिनानिमित्त ‘गावकथा’ नाट्य प्रयोगाचे आयोजन

‘बाईमाणूस’च्या वर्धापनदिनानिमित्त बालाजी सुतार यांच्या ‘गावकथा’चा १९ एप्रिलला नाट्य प्रयोग

छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण महाराष्ट्रातील गाव-खेड्यांचा भोवताल, मागच्या दोन-तीन दशकांत अतिशय झपाट्याने बदलून गेला आहे. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक मूल्यभानाचा र्‍हासही खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे. शेतीची बिकट अवस्था, स्त्रियांचं अवघड आयुष्य, दिशाहीन तरूणाई आणि मूल्यविहीन ग्रामीण राजकारण अशा अनेक अंगांनी गावाचा वेध घेणारी एक नावाजलेली नाट्यकृती म्हणजे ‘गावकथा’. लोकप्रिय लेखक बालाजी सुतार यांच्या कथांचे, ललित गद्याचे अंश आणि कविता यांच्यावर आधारित संहितेचे नाट्य-सादरीकरण असलेल्या ‘गावकथा’ या नाट्यप्रयोगाचे सध्या महाराष्ट्रात अनेक प्रयोग होत असून. हा नाट्यप्रयोग सध्या राज्यभर गाजत आहे. याच ‘गावकथा’चा प्रयोग शुक्रवार, दिनांक, १९ एप्रिल २०२४ रोजी महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात सायंकाळी ७.३० वा. आयोजित करण्यात आला आहे.

माध्यम क्षेत्रात महिलांचे प्रश्न घेऊन एक स्वतंत्र माध्यम व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘बाईमाणूस’च्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त खास या नाटकाचा प्रयोग होत असून एमजीएम विद्यापीठ कॉलेज ऑफ जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशनचे त्याला सहकार्य लाभले आहे. ‘गावकथा’ हा नाट्य-प्रयोग सर्वांसाठी खुला आहे.

Advertisement

‘आख्यायिका’ या संस्थेने ‘गावकथा’ची निर्मिती केली असून अमृत महाजन यांनी दिग्दर्शन केले आहे. प्रयोगाला बालाजी सुतार आणि गोपाल तिवारी यांची गीते असून मयुर मुळे आणि प्रसाद कुलकर्णी यांचे संगीत आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईच्या एकूण १६ कलाकारांच्या चमूंनी ही’गावकथा’ मांडली आहे.

काळ पुढे सरकतोय, तसा भवताल बदलतोय. हा बदल केवळ शहरांमध्येच होतोय असं नाही, तर गावाचंही रुपडं पालटतंय. जागतिकीकरणाची चाहूल लागलेल्या १९९०पासून बदल सुरू झाले, पुढे तंत्रज्ञान, समाजमाध्यमांमुळे बदल अधिक वेगानं होत गेले. समकालीन लेखक बालाजी सुतार यांनी हे बदल त्यांच्या साहित्यातून टिपले आहेत. बालाजी सुतार यांच्या कथा, नोंदी, कवितांवर आधारित ‘गावकथा’ या नाटय़कृतींतून बदलत्या गावांचा कॅलिडोस्कोप दाखवण्यात आला आहे. मराठी नाट्यवतुर्ळात रसिकांच्या पसंतीस पडलेल्या ‘गावकथा’ नाटकाला छत्रपती संभाजीनगरच्या नाट्यप्रेमींनी आवर्जून उपस्थित रहावे, अशी विनंती एमजीएम विद्यापीठ कॉलेज ऑफ जर्नालिझमच्या प्राचार्य डॉ रेखा शेळके आणि बाईमाणूसचे संपादक प्रशांत पवार यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page