एमजीएम विद्यापीठामध्ये दाखविण्यात आला ‘लान्झा डेल वास्तो’ यांच्या जीवनावर आधारित महितीपट
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठात गांधी अध्यासन विभागाच्या वतीने फ्रांस येथील गांधी म्हणून ओळख असलेले व महात्मा गांधी यांचे कार्य पुढे चालू ठेवलेले ‘लान्झा डेल वास्तो’ यांच्या जीवनावर आधारीत माहितीपट विद्यापीठातील व्ही. शांताराम सभागृहात दाखवण्यात आला. हा माहितीपट फ्रांस येथून आलेले लुई कॅम्पाना यांच्या माध्यमातून दाखविण्यात आला. फ्रांस येथून लुई कॅम्पाना तीन दिवसाच्या भेटीसाठी एमजीएम विद्यापीठात आले होते. ते फ्रांस येथे ‘शांती असोसिएशनचे’ संस्थापक अध्यक्ष आहेत. २००८ साली त्यांना बजाज फाऊंडेशन तर्फे दिला जाणारा ‘जमनालाल बजाज पुरस्काराने’ गौरवण्यात आलेले आहेत.
त्यांनी या महितीपटात ‘लान्झा डेल वास्तो’ यांनी गांधीची भेट घेऊन गांधींनी दिलेले वैयक्तिक आणि सामाजिक मूल्ये यांचा वारसा घेऊन फ्रांसमध्ये कशाप्रकारे सत्य, अहिंसा आणि शाश्वत विकासाची मूल्ये रुजविली याची माहिती दिली. त्याचप्रमाणे यामध्ये शेतीविकास, पशुपालन, सूतकताई याचबरोबर छोट्या उद्योगांना प्रोत्साहन आणि विकास याची माहिती दाखविली.
फ्रेंच राज्यक्रांतिने जगाला स्वातंत्र्य,समता आणि बंधुता दिली. परंतु नंतरच्या काळात ह्याच मूल्यांचा विसर फ्रांस मध्ये पडला. शिवाय अहिंसा हे तत्व घेऊन राजकरणात तिचा वापर होऊ शकतो, त्यातूनही स्वातंत्र्य,समता आणि बंधुता प्राप्त करता येते हे ‘लान्झा डेल वास्तो’ यांनी फ्रेंच समाजाला दाखवून दिले याचाही आढावा या माहितीपटात घेण्यात आला. माहितीपट दाखविल्यानंतर लुई कॅम्पाना यांनी या माहितीपटावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी फ्रांस येथील इझा बेल, गांधी अध्यासन विभागाचे प्रमुख जॉन चेल्लादुराई, प्रा. हेमंत देसरडा, राजेंद्र देशपांडे, मच्छिंद्र गोर्डे, प्रा. भागवत वाघ, अमरजीत आसोलकर, योगिता महाजन, विद्यार्थी, अभ्यासक व शहरातील नागरिक उपस्थित होते.