जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेत हजाराहुन अधिक संशोधकांची नोंदणी

छत्रपती संभाजीनगर व जालना येथे आज स्पर्धा

धाराशिव व बीड येथे १० तारखेला आयोजन

छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे करोनानंतर प्रथमच जिल्हास्तरीय आविष्कार या संशोधन व नवोपक्रम स्पर्धेचे दि ८ व १० रोजी आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेस संशोधकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. चार जिल्ह्यातून ६८८ संघ अर्थात १०६२ विद्यार्थी संशोधकांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ कैलास अंभुरे व समन्वयक प्रा भास्कर साठे यांनी दिली.

राजभवन तर्फे विद्यार्थ्यांमधील संशोधन व नवोपक्रम गुणांना वाव देण्यासाठी 2006 पासून आविष्कार या संशोधन स्पर्धेचे आयोजन केले जाते. तत्पूर्वी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे जिल्हास्तरावर आयोजित करण्यात आलेल्या आविष्कार या स्पर्धेत संशोधक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत नोंदणी केली आहे. देवगिरी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर व मॉडेल कॉलेज घनसावंगी येथे सकाळी १० वा उद्घाटन होऊन स्पर्धेस प्रारंभ होत आहे.

Advertisement

यामध्ये छत्रपती संभाजीनगर व जालना या दोन जिल्ह्यात क्रमशः 475 व 49 संघांनी तीन स्तरात नोंदणी केली आहे. यामध्ये क्रमशः 731 व ६८ विद्यार्थी सहभागी होणार आहेत. तर सौ के एस के महाविद्यालय, बीड आणि विद्यापीठ उपपरिसर धाराशिव येथे दिनांक 10 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या स्पर्धेकरिता क्रमशः 75 व 109 संघांनी नोंदणी केली आहे. यामध्ये तीन स्तरांत क्रमशः 130 व 133 विद्यार्थी संशोधक सहभागी होणार आहेत.

कुलगुरू महोदयांच्या मार्गदर्शनाखाली व प्र-कुलगुरु, कुलसचिव यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हास्तरावर होणाऱ्या आविष्कार स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे महाविद्यालय व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेस उत्तम प्रतिसाद देत नोंदणी केली आहे. याचे श्रेय मुख्य समन्वयक प्रा. भास्कर साठे यांच्यासह संयोजन समिती, जिल्हा समन्वयक, आयोजक महाविद्यालय, प्राचार्य, प्राध्यापक वृंद व मार्गदर्शकांचे आहे. यामुळे राज्यस्तरावर आपल्याला अधिकाधिक प्राविण्य संपादन करता येईल अशी अपेक्षा आहे.

डॉ. कैलास अंभुरे
संचालक
विद्यार्थी विकास मंडळ

ही स्पर्धा सहा गटात होणार असून यामध्ये मानव्यविद्या, भाषा आणि ललितकला, वाणिज्य, व्यवस्थापन व विधी, विज्ञान, कृषी व पशुसंवर्धन, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान आणि औषधनिर्माणशास्त्र यांचा समावेश आहे. कुलगुरू प्रा विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली व प्र-कुलगुरू प्रा वाल्मिक सरवदे व कुलसचिव प्रा प्रशांत अमृतकर यांच्या दिग्दर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रा प्रवीण यन्नावार, डॉ सादिक बागवान, प्रा पुरुषोत्तम देशमुख, प्रा आर पी चोंडेकर, प्रा विष्णू पाटील, प्रा दिनेश लिंगमपल्ले, प्राचार्य रामराव चव्हाण, प्रा संदीप पाटील आदी जिल्हा व महाविद्यालयीन स्तरावर समन्वयक म्हणून प्रयत्न करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page