नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागात ‘केमिस्ट्री सोसायटी’चे गठन
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर रसायनशास्त्र विभागात २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता ‘केमिस्ट्री सोसायटी’चे गठन करण्यात आले. विभागातील सभागृहात हा कार्यक्रम मंगळवार, दिनांक २४ सप्टेंबर २०२४ रोजी पार पडला. शिक्षक व विद्यार्थ्यांचा या सोसायटीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख डॉ एन एन करडे यांनी अध्यक्षस्थान भूषविले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सीएसआयआर निरी येथील सॉलिड अँड हॅजर्डस वेस्ट डिव्हिजनचे प्रधान शास्त्रज्ञ डॉ रमेश कुमार, विशेष अतिथी म्हणून प्रा डब्ल्यू बी गुरूनुले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना प्रा गुरूनुले यांनी विद्यार्थ्यांना निश्चित ध्येयाचा पाठलाग करण्यासाठी परिश्रम करण्याचे आवाहन केले.
वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ रमेश कुमार यांनी केमिस्ट्री सोसायटीचे जागतिक आणि राष्ट्रीय पातळी वरील महत्त्व समजावून सांगितले. सोबतच याविषयी महत्त्वपूर्ण सादरीकरण केले. दुसऱ्या वर्षातील विद्यार्थिनी युक्ती पटेल हिने विभागातील तिला आलेले अनुभव वर्णन केले. यामध्ये पदव्युत्तर रसायनशास्त्र विभाग कडून विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या उत्कृष्ट सुविधा, पायाभूत सुविधा आणि विभागातील उत्कृष्ट शैक्षणिक वातावरणाबाबत तिने माहिती दिली. डॉ विजय तांगडे यांनी २०२४-२५ शैक्षणिक सत्रासाठी केमिस्ट्री सोसायटीचे गठन तसेच मागील सत्रात सोसायटीकडून आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
प्रमुख अतिथी डॉ रमेश कुमार यांना २०२२-२३ या शैक्षणिक क्षेत्रात सीएसआयआर-एनईईआरआयमध्ये सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञ मान मिळाल्याने त्यांचा विभाग प्रमुख डॉ करडे यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात प्रा डब्ल्यू बी गुरूनुले यांचा देखील सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी केमिस्ट्री सोसायटीचे उद्घाटन डॉ रमेश कुमार यांनी बोर्डवर सोडियम हायड्रॉक्साइड फवारत केले. बोर्डवर सोडियम हायड्रॉक्साइड फवारल्याने फिनोलफ्थेलिनसोबत ॲसिड-बेस प्रतिक्रिया घडली आणि सोसायटीचे नाव प्रकट झाले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळाल्याने विभाग प्रमुख डॉ एन एन करडे यांना डॉ रमेश कुमार यांच्या शुभहस्ते शॉल आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप उपाध्यक्ष ज्योती पिल्लाई यांनी आभार मानून केले, तर अमृता रुपचंदानी आणि मनीषा ठाकूर यांनी सुरेखपणे संचालन केले. रसायनशास्त्र विभागातील विविध शाखांचे सुंदर चित्रण करणाऱ्या रांगोळ्या विद्यार्थ्यांनी साकारल्या होत्या त्यामुळे एक वेगळ्याच उत्सवाची छटा या कार्यक्रमाला आली होती. या कार्यक्रमामुळे विभागातील विद्यार्थ्यांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झाले आहे.
केमिस्ट्री सोसायटीचे गठन
केमिस्ट्री सोसायटीचे प्रभारी शिक्षक म्हणून डॉ विजय तांगडे, अध्यक्ष म्हणून युक्ती पटेल, उपाध्यक्ष म्हणून ज्योती पिल्लाई, सचिव म्हणून अमृता रुपचंदानी, सहसचिव म्हणून आकाश कुमार भारती, कोषाध्यक्ष म्हणून श्रुती पवार, सह-कोषाध्यक्ष म्हणून अंचल चौधरी, सदस्य म्हणून पृथा देवईकर, प्रतीक भगत, विभा ताटेड, अर्पिता गडधने, नेहा सिंग यांचा समावेश आहे.
विभागातील नेट-सेट उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार
रसायनशास्त्र विभागातील नेट, सेट आणि गेट परीक्षा उत्तीर्ण केलेल्या उत्कृष्ट विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रज्वल उडान, निकिता पटले, अपूर्वा बंबल, जानवी धोते, स्नेहा बँकर, वैभव जयस्वाल यांचा समावेश आहे.