डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘अभिजात मराठी भाषा कृतज्ञता सोहळा’ संपन्न

अभिजात भाषेच्या दर्जामुळे जबाबदारी वाढली – डॉ ऋषीकेश कांबळे

छत्रपती संभाजीनगर : मराठी भाषेची परंपरा महान आहे. तिचे संदर्भ इ स दुसऱ्या शतकापासून सापडतात. तद्वतच मराठी साहित्याची परंपराही महान असल्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. ही सर्व मराठी जनांसाठी आनंद आणि अभिमानाची बाब आहे. मात्र त्यासोबतच सर्व मराठी माणसांची जबाबदारी देखील वाढली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक डॉ ऋषिकेश कांबळे यांनी केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागात ‘अभिजात मराठी भाषा कृतज्ञता सोहळा’ या विद्यार्थ्यांतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ दासू वैद्य, डॉ कैलास अंभुरे यांची उपस्थिती होती.

‘अभिजात मराठी भाषा कृतज्ञता सोहळा’निमित्त बोलताना डॉ ऋषीकेश कांबळे. मंचावर प्रा दासू वैद्य व डॉ कैलास अंभुरे.

मराठी भाषेची समृद्ध परंपरा सांगताना पुढे डॉ कांबळे म्हणाले, जगामध्ये १२ हजार बोलीभाषा आहेत. भारतातील लिपीबद्ध भाषांची संख्या १६ आहे. प्राचीन लिपीबद्ध भाषेमध्ये अग्रक्रमाने तमिळ भाषा येते. त्यानंतर मराठी भाषा येते. मराठी भाषा आणि साहित्याची दीर्घ व समृद्ध परंपरा असल्याचे अनेक पुरावे इ स दुसऱ्या शतकापासून मिळतात. तद्वतच आधुनिक काळात भाषा शुद्धीकरणाचे अनेक प्रयोग झाले. मध्ययुगीन काळातील संत कवींनी आणि आधुनिक काळातील महापुरुषांनी त्यांच्या साहित्याद्वारे भाषा समृद्ध करण्याचे काम केले.

Advertisement

मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यामुळे केंद्र शासनाकडून ५०० कोटी रुपयांचा निधी भाषा विकासासाठी व संशोधनासाठी दिला जाणार आहे. यानिमित्ताने मराठी भाषा व साहित्यविषयक अधिकाधिक संशोधन होईल. देशभरातील विद्यापीठांमध्ये मराठी भाषा अभ्यासली जाईल. बोली भांषांचे संशोधन व संकलन होईल. मराठी शाळेची गुणवत्तादेखील सुधारेल. सोबतच मराठी भाषा विद्यापीठ अधिक जोमाने उभे राहील. मात्र या सर्वांमध्ये मराठी भाषिकांची जबाबदारी अतिशय महत्त्वाची आहे असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोपात डॉ वैद्य म्हणाले, मराठी भाषा ही अभिजात च आहे यासंदर्भात मराठी विभागाने अनेक विद्यार्थी, प्राध्यापक व संशोधकांद्वारे २०१० आणि २०१४ असे सलग दोन वेळा मराठी अभिजात भाषेच्या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाला हजारो पोस्ट कार्ड पाठवले होते त्याचे उत्तर आज मिळाले.

या कार्यक्रमात मराठी विभागातील प्रा दासू वैद्य, डॉ रमेश जाधव, डॉ कैलास अंभुरे, रामेश्वर वाकणकर, डॉ वाल्मिक वाघमारे, संशोधक डॉ आकाश पवार, डॉ कोंडबा हाटकर, प्रकाशक- ग्रंथ विक्रेते समाधान दहिवाळ यांचा आणि कविवर्य ना धों महानोर पुरस्कार मिळाल्याबद्दल कवी गणेश घुले यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक डॉ दैवत सावंत तर सूत्रसंचालन हनुमान गिरी याने केले आणि गौतम घाडगे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सृष्टी पोफळे, अमोल कांबळे व अक्षय मुनेश्वर यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page