कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयात ६१ व्या ज्योतिषवाक्यार्थ सभा संपन्न
धन-पुत्र प्रदाता पितृपक्ष – प्रो कृष्णकुमार पाण्डेय
रामटेक : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्व विद्यालयाच्या ज्योतिष व वास्तु परामर्श केंद्राच्या ६१ व्या ज्योतिषवाक्यार्थ सभेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सभेचे अध्यक्ष प्राचीन भारतीय विज्ञान तथा मानव्य शास्त्रे संकायचे अधिष्ठाता प्रो कृष्णकुमार पाण्डेय महोदय यांनी भाद्रपदातील संपूर्ण वद्य पक्ष हा पूर्वजांसाठी समर्पित करण्यात आला आहे. या पक्षात पितरांचे स्मरण करून त्यांचे पूजन केले जाते म्हणून याला पितृपक्ष किंवा पितृ पंधरवडा असे म्हणतात असे सांगितले.
पितृ पंधरवडा सुरू आहे आणि ०२ ऑक्टोबर २०२४ रोजी सर्वपित्री अमावस्या आहे. पितरांविषयी आदर बाळगणे, त्यांच्या नावे दानधर्म करणे व त्यांना संतोष होईल अशी कृत्ये करणे हे वंशजांचे कर्तव्य आहे असे धर्मशास्त्र सांगते. देवपितृकार्याभ्यां न प्रमदितव्यम् । देव आणि पितर यांच्या कार्यात हेळसांड करू नये असा उपनिषदांचा आदेश आहे. महालय श्राद्धात कुटुंबातील दिवंगत व्यक्तींचे पिंडरूपाने स्मरण-पूजन करण्याची परंपरा आहे. जिवंत असतील ते वगळून इतरांच्या नावाचा उल्लेख करतात, असे मुख्य वक्ता अनुज शर्मा यांनी सांगितले.
पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या चार दिशांना चार धर्मपिंडे देण्याची पद्धत या श्राद्धात विशेषकरून आहे. चार दिशांना मृत झालेल्या ज्ञात-अज्ञात जीवांसाठी यजमान हे पिंडदान करतात. महालय श्राद्धात क्षणदान, अर्घ्यदान, पूजा, अग्नौकरण, पिंडदान, विकिरदान, स्वधावाचन वगैरे विधी करावयाचे असतात. योग्य तिथीवर महालय करणे अशक्य झाल्यास पुढे सूर्य वृश्चिक राशीला जाईपर्यंत कोणत्याही योग्य तिथीला महालय केला तरी चालतो असे संबोधित केले. सभेचे सूत्रसंचालन डॉ अंबालिका सेठिया यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रणव मुळे यांनी केले. याप्रसंगी प्रो मराठे सर, प्रो गोखले सर, डॉ आशिष जे, डॉ हृषिकेश साहु व विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.