मंगळवारपासून वडाळ्याच्या लोकमंगल कॉलेजमध्ये रंगणार युवा महोत्सव

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते होणार उद्घाटन

पारितोषिक वितरणला सैराट फेम आर्ची व परश्याची उपस्थिती

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 20 वा युवा महोत्सव वडाळा येथील लोकमंगल विज्ञान व उद्योजकता महाविद्यालय येथे होणार असून मंगळवार, दि 1 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी दहा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा प्रकाश महानवर यांनी दिली.

मंगळवारी सकाळी दहा वाजता केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या हस्ते यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा होणार आहे. यावेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील, आमदार सुभाष देशमुख, प्र-कुलगुरू लक्ष्मीकांत दामा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा प्रकाश महानवर हे असतील. दि 1 ते 4 ऑक्टोबर 2024 या कालावधीत नृत्य, नाट्य, लोककला, ललित, वांग्मय, संगीत विभागातील एकूण 39 कलाप्रकारांचे सादरीकरण या युवा महोत्सवात होणार आहे. सुमारे 60 महाविद्यालये आणि जवळपास 1600 विद्यार्थी कलाकारांचा यामध्ये सहभाग राहणार आहे.

युवा महोत्सवाच्या पहिल्या दिवशी मंगळवार, दि 1 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी आठ वाजता नोंदणी, उद्घाटन सोहळा, संघ व्यवस्थापकांची बैठक, लावणी, समूह गायन (भारतीय),  कातरकाम, मूक अभिनय, प्रश्नमंजुषा (लेखी), वक्तृत्व मराठी, भारुड, काव्यवाचन, भित्तीचित्रण, मेहंदी, भजन, एकांकिकेचे सादरीकरण होणार आहे.

Advertisement

बुधवार, दि 2 ऑक्टोबर रोजी शास्त्रीय नृत्य, सुगम गायन, वक्तृत्व इंग्रजी, पथनाट्य, स्थळचित्रण, लोक वाद्यवृंद, जलसा, स्थळ छायाचित्रण, पोवाडा, शास्त्रीय सुरवाद्य, कथाकथन, मिमिक्री, व्यंगचित्र, कव्वाली आणि एकांकिका आदी स्पर्धा पार पडतील. गुरुवार दि 3 ऑक्टोबर रोजी प्रश्नमंजुषा (तोंडी), निर्मिती चित्र, शास्त्रीय गायन, पाश्चात्य समूहगायन, वक्तृत्व हिंदी, पाश्चिमात्य वादन, रांगोळी, शास्त्रीय तालवाद्य, मातीकाम आणि लोकनृत्याच्या स्पर्धा रंगतील.

शुक्रवार, दि. 4 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 8 वाजता शोभायात्रा पार पडल्यानंतर दुपारी सव्वा बारा वाजता पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण केले जाणार आहे.अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा प्रकाश महानवर हे असतील यावेळी पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर यावेळी विक्रांत पाटील, आमदार सुभाष देशमुख,  प्र-कुलगुरू प्रा लक्ष्मीकांत दामा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या युवा महोत्सवात विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील युवा विद्यार्थी कलावंतांनी मोठ्या उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन कुलसचिव योगिनी घारे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ केदारनाथ काळवणे यांनी केले आहे.

साउंड, निवास, भोजन व्यवस्था चोख

यंदाच्या युवा महोत्सवाचे यजमान लोकमंगल महाविद्यालयाकडून यांच्याकडून जोरदार तयारी सुरू आहे. संस्थेचे अध्यक्ष रोहन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी, परीक्षक, मान्यवर यांच्या भोजन, निवास आदी व्यवस्थेचे चोख नियोजन करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे मुख्य रंगमंच आणि इतर स्पर्धेसाठी चार ते पाच मोठे रंगमंचाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. कलाप्रकार सादरीकरणासाठी उत्तम साऊंड व्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी कलाकारांना कोणतीच अडचण भासणार नसल्याचा विश्वास विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ केदारनाथ कळवणे यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page