सुप्रसिद्ध श्वसनरोगतज्ञ डॉ अखिल बिंद्रा यांची दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाला भेट

सावंगी रुग्णालयातील सुविधा व रूग्णसेवा जागतिक दर्जाची

आंतरराष्ट्रीय श्वसनरोगतज्ज्ञ डॉ बिंद्रा यांची कौतुकाची थाप

वर्धा : अमेरिका येथील क्लेवलँड क्लिनिकमधील सुप्रसिद्ध श्वसनरोगतज्ञ डॉ अखिल बिंद्रा यांनी नुकतीच दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाला भेट दिली. त्यांच्या आठवडाभरात वास्तव्यात त्यांनी संस्थेतील विविध विभागांचे अवलोकन करताना सावंगी मेघे रुग्णालयातील सुविधा व रुग्णसेवा जागतिक दर्जाची असल्याचा अभिप्राय नोंदविला.

आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील श्वसनरोग विभागासह डॉ बिंद्रा यांनी अतिदक्षता विभाग, डायलिसिस विभाग, कॅथ लॅब, इंटरव्हेंशनल रेडिऑलॉजी या विभागांना भेट देत तेथील सुविधांची पाहणी केली. यासोबतच सावंगी व सालोड परिसरातील मेघे विद्यापीठातील अन्य महाविद्यालये व रुग्णालयांसह महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय व अनुसंधान केंद्रातील जिज्ञासा, अनुकृती, रसशाळा, हर्बल गार्डन अशा विविध उपक्रमांनाही भेट दिली. एकाच परिसरात ॲलोपॅथी आणि आयुर्वेद हे हातात हात घालून रुग्णसेवा करण्यास कटिबद्ध असल्याबाबत त्यांनी आनंद व्यक्त करीत नव्या संकल्पनांचे कौतुक केले. 

Advertisement

डॉ अखिल बिंद्रा यांच्या भेटीनिमित्त श्वसनरोग विभागामध्ये रुग्णांसाठी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात डॉ बिंद्रा यांनी विनामूल्य रुग्णतपासणी करून आपल्या संवादात वैद्यकीय सल्लाही दिला. तर क्रिटिकल केअर अपडेट या विषयावर आयोजित परिसंवादात डॉ अखिल बिंद्रा यांनी विविध आजारांसंबंधी पदवी अभ्यासक्रम तथा पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर, अभियांत्रिकी महाविद्यालयातील वैद्यकीय क्षेत्राशी पूरक असणारे संशोधन व तंत्रज्ञान याबाबत जाणून घेताना रुग्णसेवेचा दर्जा वाढवण्यास हा संयुक्त उपक्रम उपयुक्त ठरेल, अशी आशा डॉ बिंद्रा यांनी व्यक्त केली. 

या भेटीदरम्यान अभिमत विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ वेदप्रकाश मिश्रा, कुलगुरू डॉ ललितभूषण वाघमारे, प्र-कुलगुरू डॉ गौरव मिश्रा यांच्या हस्ते डॉ अखिल बिंद्रा यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना आंतरराष्ट्रीय ॲड्जंक्ट फॅकल्टी ऑफ इमिनंस म्हणून गौरविण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ श्वेता काळे पिसूळकर, कार्यकारी संचालक डॉ अनुपमरार, संचालक डॉ तृप्ती वाघमारे, डीएमआयएचईआर ग्लोबलचे संचालक डॉ संदीप श्रीवास्तव, जवाहरलाल नेहरू वैद्यकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ अभय गायधने, श्वसनरोग विभागप्रमुख डॉ बाबाजी घेवडे, डॉ वैभव अंजनकर, डॉ उल्हास जाधव, डॉ पवन बजाज आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page