श्री बंकटस्वामी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न

राष्ट्रप्रेम व नैतिक मूल्य विकसित करण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजना विभाग करतो – प्राचार्य डॉ आबासाहेब देशमुख

बीड : श्री बंकटस्वामी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती व समाज सेवेची भावना रुजवण्यासाठी आपल्या देशात 24 सप्टेंबर 1969 रोजी राष्ट्रीय सेवा योजना कार्यान्वित करण्यात आली असल्यामुळे 24 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय सेवा योजना म्हणून भारतभर सर्वत्र साजरा केला जातो. यानिमित्त स्वच्छ भारत अभियान अंतर्गत महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघाचे अध्यक्ष व शंकरराव मोहिते महाविद्यालय,अकलूजचे माजी प्राचार्य डॉ आबासाहेब देशमुख यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विवेक मिरगणे हे होते.तर व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ शिवाजी मोरे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा ब्रम्हनाथ मेंगडे यांची उपस्थिती होती.

Advertisement

प्राचार्य डॉ आबासाहेब देशमुख यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे ध्येय, उद्दिष्टे व विविध उपक्रमांची माहिती दिली. राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये मनापासून सहभाग घेऊन काम केल्यास विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व कसे विकसित होऊ शकते याबद्दलची माहिती त्यांनी दिली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा ठासून भरलेली असते ती त्याला स्वस्थ बसू देत नाही. त्या ऊर्जेला राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून योग्य दिशा व वळण दिल्यास विद्यार्थ्यांच्या हातून राष्ट्रहिताचे व समाजसेवेचे काम चांगल्या प्रकारे होऊ शकते आणि जर त्यांच्या ऊर्जेला योग्य दिशा मिळाली नाही तर त्याच्या हातून विध्वंसक काम होऊ शकते, राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये मनापासून सहभागी झाल्यास समाजसेवेतून शिक्षण होऊन पर्यायाने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकसित होते, कोणतेही काम करण्याची त्याला लाज वाटत नाही, त्याच्यामध्ये आत्मविश्वास वाढतो, कौशल्य विकसित होते, नेतृत्व गुण निर्माण होतात, समाजासाठी,राष्ट्रासाठी काहीतरी चांगले केले पाहिजे ही भावना त्याच्यामध्ये निर्माण होते, प्रत्येक राष्ट्रीय व सामाजिक कार्यात तो स्वयंस्फूर्त पुढाकार घेतो, व्यसनापासून व कुसंगती पासून दूर राहतो असे अनेक फायदे राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना होतात तसेच त्यांचे व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलू विकसित होतात.

श्री बंकटस्वामी महाविद्यालयाचा पर्यावरण संवर्धनाचा दंडकारण्य प्रकल्प राज्यपालांनी दखल घेऊन महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांना लागू केला अशा महाविद्यालयात आपण राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आहात याचा सर्वांनाच अभिमान आहे आणि अशा महाविद्यालयात मला आमंत्रित केले त्याबद्दल मी आपले सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो असे गौरवोजगार त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा डॉ अरुण दैतकार प्रा डॉ मनोज नवसे प्रा डॉ शिवशेट्टे यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा दत्ता तोडकर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ शंकर शिवशक्ती यांनी मानले.

याप्रसंगी गढी येथील महाविद्यालयाचे डॉ प्रा यशवंतकर, डॉ प्रा रिंगणे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील स्वयंसेवक विद्यार्थी शिक्षक प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page