पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार माजी सर न्यायाधीश उदय लळीत यांना जाहीर
19 वा वर्धापन दिन; प्रभारी कुलगुरू डॉ. कामत यांच्याकडून विविध पुरस्कारांची घोषणा
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा प्रतिष्ठेचा व मानाचा जीवनगौरव पुरस्कार सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश श्री उदय उमेश लळीत यांना जाहीर झाल्याची घोषणा प्रभारी कुलगुरु डॉ. राजनीश कामत यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वर्धापनदिनी दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांची घोषणा प्रभारी कुलगुरू डॉ. कामत यांनी गुरुवारी केली. यात सोलापूर ही जन्मभूमी, कर्मभूमी व ऋणानुबंध असणाऱ्या महनीय व्यक्तीस जीवनगौरव हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातो. यंदाच्या या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी लळीत हे ठरले आहेत. विद्यापीठाच्या अधिकार मंडळाकडून जीवनगौरव पुरस्कार स्वीकारण्यासाठी श्री लळीत यांना विनंती केली होती, त्यांनी सदरील विनंती स्वीकारली आहे. रोख 51 हजार रुपये, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सोमवार, दि. 1 ऑगस्ट 2023 रोजी विद्यापीठाचा 19 वा वर्धापन दिन समारंभ साजरा होणार आहे. सकाळी आठ वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम प्रभारी कुलगुरू डॉ. कामत यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर सकाळी नऊ वाजता सोलापूर शहरातील हुतात्मा स्मृती मंदिर सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. या समारंभास मुंबई विद्यापीठ, मुंबईचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. वर्धापन दिनाच्या या सोहळ्याला विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य, विविध अधिकार मंडळाचे सदस्य, शिक्षणप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेसाठी प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे, कुलसचिव योगिनी घारे, पत्रकारिता विभागप्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर, जनसंपर्क अधिकारी राहुल वंजारे आदी उपस्थित होते.
जाहीर पुरस्कार यादी
1) उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार:
एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, केगाव, सोलापूर
2) उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार :
प्राचार्य डॉ. शंकर नवले, एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, केगाव, सोलापूर
प्राचार्य डॉ. राजशेखर हिरेमठ, श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य शिक्षणशास्त्र महाविद्यालय, सोलापूर
3) उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार (विद्यापीठ):
डॉ. रवींद्र चिंचोलकर, सामाजिकशास्त्रे संकुल
डॉ. राजीवकुमार मेंते, संगणकशास्त्र संकुल
4) उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार (महाविद्यालय):
प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, डी. बी. एफ. दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, सोलापूर
प्रा. डॉ. चंद्रकांत चव्हाण, वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स सोलापूर
5)उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार:
डॉ. अभिजीत जगताप, वैद्यकीय अधिकारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
डॉ. उमराव मेटकरी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर.