राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘महिला सुरक्षितता व शिष्यवृत्ती’ या विषयावर कार्यशाळा संपन्न

महिलांनी अत्याचाराप्रती जागरूक राहावे – रश्मिता राव

नागपूर : महिलांनी अत्याचाराप्रती जागरूक राहत तक्रारीसाठी पुढे येण्याचे आवाहन नागपूरच्या पोलीस उपायुक्त रश्मिता राव यांनी केले. महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महिला सुरक्षितता व शिष्यवृत्ती’ या विषयावर कार्यशाळा अंबाझरी मार्गावरील गुरुनानक भवन येथे शुक्रवार, दिनांक २० सप्टेंबर २०२४ रोजी पार पडली. या कार्यशाळेत प्रमुख अतिथी म्हणून रश्मिता राव मार्गदर्शन करीत होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ संजय दुधे होते तर प्रमुख अतिथी म्हणून नागपूरच्या पोलीस उपायुक्त रश्मीता राव, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, कार्यस्थळी लैंगिक शोषण व लिंगभेद अत्याचार विरोधी संरक्षण समितीच्या अध्यक्ष डॉ. शालिनी लिहितकर, सदस्य डॉ. वंदना धवड यांची उपस्थिती होती. महिला अत्याचाराच्या घटना, प्रशासकीय साधने आणि तक्रार आल्यास काय करायला हवे अशा तीन टप्प्यात राव यांनी महिला अत्याचार व सुरक्षिततेबाबत भाषणात मार्गदर्शन केले.

घराच्या उंबरठ्याबाहेर येऊन सर्वच क्षेत्रात कार्य करीत आर्थिक महासत्ता बनविण्याच्या दृष्टीने महिला कार्य करीत आहे. मात्र, त्यांना त्या तुलनेत मोबदला आणि सुरक्षा मिळताना दिसत नाही. पोलीस विभाग महिलांना सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा देण्याचा प्रयत्न करते. कार्यस्थळी महिलांना अधिकाधिक सुरक्षा देण्याचे कार्य शैक्षणिक संस्थांना करावयाचे आहे. घटना घडल्यास संस्थांनी देखील पीडीतेचे तक्रार देण्याबाबत मनोबल वाढविले पाहिजे, असे राव म्हणल्या. कार्यस्थळी अत्याचार प्रकरणाच्या अनेकदा तक्रारी पुढे येत नाही. त्यात कारवाईस मर्यादा येतात. मात्र, पोक्सो कायद्यात तक्रार न देणे देखील गुन्हा असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रत्येक शाळा, महाविद्यालय, विविध संस्था या ठिकाणी अंतर्गत समित्या आहेत. या समित्या केवळ नाममात्र नसाव्या. महिलांना बोलते करावे. सोबतच महिला सुरक्षिततेबाबत नियमित कार्यक्रमांचे आयोजन करावे असे राव म्हणाल्या. शैक्षणिक परिसरात पोलिसांचे पेट्रोलिंग झाल्यास सुरक्षिततेत वाढ होईल. या सोबतच शैक्षणिक क्षेत्रात दुर्लक्षित असलेल्या ठिकाणांचा शोध घेत त्या ठिकाणी सीसीटीव्ही व अन्य सुरक्षा उपाय योजना करण्याचे आवाहन त्यांनी केले. पोलीस अधिकारी होण्यापूर्वी शिक्षण घेत असताना आलेले अनुभव विषद करताना रश्मीता राव यांनी अनेक ठिकाणी मुली असुरक्षित असल्याचे सांगितले. सार्वजनिक ठिकाणी, शैक्षणिक परिसरात घटना होताना दिसून येत असल्याने प्रशासकीय सुरक्षा साधनांमध्ये वाढ करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

Advertisement

पीडीतेस तक्रार करता यावी म्हणून ऑनलाइन -ऑफलाइन अशी सहज सुविधा मिळावी. तक्रार पेटीची संस्कृती यावी, संस्थांमध्ये चर्चासत्र आयोजित व्हावे, सोबतच महिलांचे नेटवर्क असावे असे त्या म्हणाल्या. शैक्षणिक क्षेत्रात रहिवासी परिसर असेल तर अन्य लोकांना प्रतिबंध करावा. सुरक्षा रक्षक नेमत नोंदणी रजिस्टर करावे. शैक्षणिक क्षेत्रात सुरक्षिततेविषयी मुलींमध्ये विश्वास निर्माण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सोबतच त्यांनी भारतीय न्याय संहितेतील महिला सुरक्षिततेबाबत असलेल्या कायद्यांची माहिती दिली. चुकीचे घडले असेल तर पीडीतेला दोष देऊ नका. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ नका. सोबतच कारवाई करण्यास विलंब करू नका असे देखील त्या म्हणाल्या. महिला सुरक्षा माझ्या हृदय स्थानी असल्याने पोलीस विभागात आले असल्याचे राव म्हणाल्या.

अध्यक्षीय भाषण करताना प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे यांनी सामाजिक मूल्यांची ऱ्हास होत असल्याने महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढत असल्याचे सांगितले. अत्याचाराच्या घटनांना आढा घालण्यासाठी चांगल्या लोकांनी एकत्र आले पाहिजे. पोलीस हा त्यावरील उपाय नसून समाज हाच त्यावर उपाय असल्याचे डॉ. दुधे म्हणाले. त्यामुळे सांस्कृतिक मूल्यांना टिकवून ठेवण्याची आपली जबाबदारी आहे. मानव म्हणून समाजामध्ये जागृतीचे कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.धार्मिक मूल्यातून समाज टिकून राहत असून गौतम बुद्ध, भगवान महावीर यांच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार केल्यास महिला सुरक्षा आपोआप होईल असे डॉ. दुधे म्हणाले.

प्रास्ताविक करताना डॉ. शालिनी लिहितकर यांनी महिलांच्या सशक्तिकरणासाठी समाजाची मानसिकता बदलण्याची गरज व्यक्त केली. शैक्षणिक क्षेत्रात महिलांची सुरक्षा महत्त्वपूर्ण आहे. कोलकाता आणि बदलापूर येथील घटनांमुळे हा धोका पुढे आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने याची गंभीर दखल घेतली असून त्यामुळे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी समितीच्या अध्यक्षा डॉ. शालिनी लिहितकर, सदस्य डॉ. प्रवीणा खोब्रागडे, डॉ. वंदना धवड, डॉ. राजेंद्र उतखेडे, माधुरी साकुलकर, मंजुषा जोशी, अन्नपूर्णा पारधी, दिव्या राठोड, दिपाली मानकर यांच्यासह सदस्यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. अमृता इंदूरकर यांनी केले तर आभार सदस्य डॉ. वंदना धवड यांनी मानले.

महिला सुरक्षिततेबाबत वक्त्यांचे मार्गदर्शन

मुख्य कार्यक्रमानंतर महिला सुरक्षिततेबाबत मार्गदर्शक तज्ञांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. यामध्ये उच्च न्यायालयातील वकील ॲड. स्मिता शिगलकर यांनी शैक्षणिक संस्थांमध्ये कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ, प्रतिबंध आणि निवारण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाचे २०१५ चे दिशानिर्देश त्याचप्रमाणे विविध घटनांचे उदाहरण देत लैंगिक अत्याचाराबाबत माहिती दिली. माधुरी साकुलकर यांनी महिला सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले. तर उच्च शिक्षण विभागातील अनिल बोंद्रे यांनी महाराष्ट्र शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या शिष्यवृत्तीबाबत माहिती दिली. यावेळी मंचावर उच्च न्यायालयातील वकील ॲड. स्मिता शिगलकर, माधुरी साकुलकर, अनिल बोंद्रे, डॉ. शालिनी लिहितकर, डॉ. प्रवीणा खोब्रागडे व डॉक्टर वंदना धवड यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page